
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. त्याच्या निधनानंतर कुटुंबात संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. हा वाद दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि पूर्व पत्नी करिश्मा कपूरची मुलं यांच्यात संपत्तीवरून कायदेशीर लढाई सुरू आहे. करिश्माच्या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेतून काहीच मिळालं नाही. त्यावरून आता संजयच्या बहिणीने भावाच्या मृत्यूपत्रावर शंका उपस्थित केली आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजयची बहीण मंदिरा कपूर स्मिथ यावर मोकळेपणे व्यक्त झाली.
“मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये की माझ्या भावाने त्याच्या मुलांचा मृत्यूपत्रात समावेश केला नाही. माझ्या कुटुंबाची अशाप्रकारे सार्वजनिकरित्या थट्टा होत असल्याचं पाहून मला खूप दु:ख होतंय. आम्ही मृत्यूपत्र वाचलंय आणि ते मला अजिबात सर्वसामान्य वाटलं नाही. माझा भाऊ त्याच्या मृत्यूपत्रात त्याच्या मुलांची नावं कशी वळू शकतो हे मला समजत नाही”, असं ती म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “करिश्माच्या मुलांना भावाच्या संपत्तीतून काहीच मिळणार नाही. हे सगळं खूपच विचित्र आहे. माझी आईसुद्धा हे ऐकून खूप अस्वस्थ झाली आहे. तिला विश्वासच बसत नव्हता. माझ्या कुटुंबाची ही एकप्रकारे सार्वजनिक थट्टाच आहे. माझ्या वडिलांनी त्यांचा वारसा तयार करण्यासाठी खूप कष्ट केलं आणि माझ्या भावाने ते सर्वकाही पुढे सांभाळलं होतं. आता संपूर्ण जगासमोर त्या सर्वांची थट्टा केली जातेय आणि तेही पैशांसाठी. मला माझ्या भावाच्या मृत्यूपत्राबद्दल बऱ्याच शंका आहेत. मी चार वर्षांपासून माझ्या भावाशी बोलत नव्हते, हे खरं आहे. पण त्याच्यासोबत लहानाची मोठी झाले, त्याच्यासोबत राहिले आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटलं तरी मी नेहमीच त्याची बहीण असेन. कारण तुम्ही कौटुंबिक संबंध तोडू शकत नाही. तुमच्या रक्ताच्या वंशापासून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. माझ्या कुटुंबाने मिळून हा वारसा उभारला आहे आणि ते सर्व आता या एकाच मुलीकडे जाणार, असं तुम्ही म्हणत असाल तर ते मान्य नाही.”
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माची मुलं समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वडिलांच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीतून आम्हाला वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवने त्यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.