Border 2: गोष्ट छोटीच पण तरी ‘बॉर्डर 2’च्या श्रेयनामावलीनं आणलं चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेली एक छोटीशी गोष्ट पाहून चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. ही गोष्ट नेमकी कोणती होती, ते जाणून घ्या..

Border 2: गोष्ट छोटीच पण तरी बॉर्डर 2च्या श्रेयनामावलीनं आणलं चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
Sunny Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 25, 2026 | 11:05 AM

सनी देओलचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट शुक्रवारी 23 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अनुराग सिंह दिग्दर्शित हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’चा सीक्वेल आहे. जे. पी. दत्ता यांचा हा मूळ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. याच उत्सुकतेपोटी ‘बॉर्डर 2’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार झाली होती. हा चित्रपट पहायला गेलेल्या प्रेक्षकांना यातील एक छोटीशी गोष्ट मनाला खूप भावली. ही गोष्ट छोटीशी असली तरी ती पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं.

‘बॉर्डर 2’च्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या श्रेयनामावलीत सनी देओलचं नाव ‘धर्मेंद्रजी का बेटा’ (धर्मेंद्रजींचा मुलगा) असं देण्यात आलं आहे. हे वाचून प्रेक्षक भावूक झाले आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यानंतर सनी देओलचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धर्मेंद्र आणि सनी देओल यांचा फोटो पोस्ट करत एका युजरने लिहिलं, ‘वाह, धर्मेंद्रजींना अत्यंत सुंदर श्रद्धांजली वाहण्यात आली आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे वाचून डोळ्यात पाणी आलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. त्यांचा शेवटचा ‘इक्किस’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रीमिअरलाही सनी देओल भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं. आता ‘बॉर्डर 2’च्या श्रेयनामावलीत अशा पद्धतीने नाव लिहून सनीने त्याच्या वडिलांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार्स दिले आहेत. ‘हा चित्रपट देशाला तसंच सशस्त्र दलांना सलाम करतो. थिएटरमध्ये आवर्जून पहावा असा चित्रपट. दिग्दर्शक अनुराग सिंहने अत्यंत दमदार पद्धतीने आणि भावनिकदृष्ट्या ही युद्धकथा सादर केली आहे. ‘बॉर्डर’चा स्तर, प्रामाणिकपणा आणि आत्मा यात खऱ्या अर्थाने उतरला आहे. त्याचसोबत हा चित्रपट कल्ट क्लासिक ‘बॉर्डर’च्या वारशाचा आदर करतो. या चित्रपटातील साहसदृश्ये फक्त दिखाव्यासाठी नाहीत. तर कथा आणि भूमिकांच्या भावनांना पुढे नेण्यात ही दृश्ये मदत करतात’, अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाचं समीक्षण केलं आहे.