ज्या सांगलीने आदर दिला, तीच आता पलाश मुच्छलची पोलखोल करणार; स्मृती मानधनाच्या बालमित्राकडून मोठा खुलासा
क्रिकेटर स्मृती मानधनाचा पूर्व प्रियकर आणि संगीतकार पलाश मुच्छल एका नव्या वादात अडकला आहे. स्मृतीचा बालमित्र विज्ञान माने याने पलाशवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर पलाशनेही त्यावर मानहानीचा दावा केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर वाचा..

संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटर स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र आणि फायनान्सर विज्ञान मानेनं त्याच्यावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर शनिवारी रात्री पलाशने पलाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित विज्ञानविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचा इशारा दिला. पलाशने लिहिलं, ‘माझे वकील श्रेयांश मिठारे यांनी सांगलीचे रहिवासी विज्ञान माने यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी माझं चारित्र्य जाणूनबुजून कलंकित करण्याच्या उद्देशाने खोटे, अश्लील आणि बदनामीकारक आरोप केले आहेत.’ आता पलाशच्या नोटिशीला विज्ञान मानेनंही उत्तर दिलं आहे.
‘अमर उजाला’ या वेबसाइटशी बोलताना विज्ञानने सांगितलं की पलाशने त्याला 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. परंतु मला खात्री आहे की यामुळे माझं काहीही नुकसान होणार नाही. मानहानीच्या नोटिशीत पलाशच्या वकिलांनी काही मीडिया रिपोर्ट्सच्या प्रतीदेखील शेअर केल्या आहेत. या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की स्मृतीशी लग्नाच्या आदल्या दिवशी पलाशला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं होतं, असा आरोप विज्ञानने केला आहे. या आरोपांवर अजूनही ठाम असल्याचं विज्ञानने म्हटलंय. मी कोणत्याही माध्यमांना कोणतंही खोटं विधान केलेलं नाही, असं त्याने स्पष्ट केलंय.
पलाश मुच्छलची पोस्ट-

यासंदर्भात विज्ञान रविवारी दुपारी 12 वाजता सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. विज्ञान पुढे म्हणाला, “ज्या सांगलीने पलाशला इतका आदर दिला तीच सांगली आता त्याची पोलखोल करणार आहे. याप्रकरणातील पूर्ण सत्य मी जनतेसमोर आणणार आहे. मी कायदेशीर पद्धतीनेही पलाशला सडेतोड उत्तर देण्याच्या तयारी आहे.” काही दिवसांपूर्वी विज्ञान मानेनं सांगली इथं पलाश मुच्छलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पलाशने त्याची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विज्ञानने केला होता. विज्ञान हा स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र असून व्यवसायाने तो चित्रपट फायनान्सर आहे. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांनी त्याची पलाशशी ओळख करून दिली होती. परंतु स्मती आणि पलाशचं लग्न मोडल्यानंतर विज्ञानने दावा केला की पलाशने त्याचे पैसे परत केले नाहीत.
