
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर बुधवारी देओल कुटुंब कडक सुरक्षाव्यवस्थेत हरिद्वारला अस्थी विसर्जनासाठी पोहोचलं होतं. हरिद्वार इथल्या गंगा नदीत धर्मेंद्र यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी सनी देओल, बॉबी देओल, करण देओल आणि कुटुंबातील इतर सदस्यही त्याठिकाणी उपस्थित होते. वडिलांच्या अस्थी विसर्जनादरम्यान सनी आणि बॉबी देओल भावूक झाले होते. देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्या अस्थींचं विसर्जन केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते सर्वजण एका व्हीआयपी घाटावर धर्मेंद्र यांच्या अस्थींचं विसर्जन करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अस्थिकलश विसर्जनाच्या वेळी देओल कुटुंबीय भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी ते एकमेकांना मिठी मारताना दिसले. गंगा नदीच्या काठावर असलेल्या हरिद्वारमधील 100 वर्षे जुन्या पिलीभीत हाऊसमध्ये देओल कुटुंबीय थांबले होते. अस्थी विसर्जनानंतर कुटुंबीय ताबडतोब तिथून निघून विमानतळाकडे रवाना झाले. या व्हिडीओमध्ये सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओल नदीत अस्थी विसर्जित करताना दिसत आहे. त्यानंतर सनी आणि बॉबी करणला मिठी मारतात.
धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दोन ठिकाणी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. एक सनी आणि बॉबी देओल यांनी तर दुसरी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी शोकसभा आयोजित केली होती. नंतर दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार करण्यामागचं कारण सांगितलं होतं. “धर्मेंद्र यांना कधीच कोणी कमकुवत किंवा आजारी असल्याचं पाहू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे हे दु:ख जवळच्या लोकांपासूनही लपवलं होतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, तेव्हा कुटुंबाला निर्णय घ्यावा लागतो”, असं त्या म्हणाल्या होत्या.
धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर आणि सनी, बॉबी, अजिता, विजेता ही चार मुलं, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि ईशा, अहाना या दोन मुली असा मोठा परिवार आहे. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र यांना 13 नातवंडंसुद्धा आहेत.