
Sushant Singh Rajput Case : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेकांची चौकशी करण्यात आली. पण अखेर याप्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला क्लीन चीट देण्यात आली आहे. बेकायदेशीर कोठडी, आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा चोरीच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपासात आढळले नाहीत, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. तर सीबीआयने सादर केलेल्या रिपोर्टमधील 5 महत्त्वाचे मुद्दे घ्या जाणून…
सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनुसार, सुशांत याने मित्र सिद्धार्थ पिठाणी याला सांगितलं होतं की, रिया कुटुंबाचा एक भाग आहे… एवढंच नाही तर, सुशांतची बहीण मीतू सिंग 8 ते 12 जूनपर्यंत त्याच्यासोबत राहिली होती. त्याची मॅनेजर श्रुती मोदी देखील फेब्रुवारी 2020 पासून पायाच्या दुखापतीमुळे त्याला भेटू शकली नव्हती.
सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हणटल्यानुसार, सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवसांपूर्वीच रियाने त्याचं घर सोडलं होतं. त्यामुळे, आत्महत्येसाठी कोणत्याही प्रकारची हेराफेरी किंवा चिथावणी देण्यात तिचा सहभाग नव्हता. तिचा भाऊ, शोविक चक्रवर्ती, 8 जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या अपार्टमेंटमधून निघून गेला आणि त्यानंतर तो त्याला भेटला नाही… असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या वस्तू घेतल्याच्या रिया चक्रवर्तीवरील आरोपांवर सीबीआयनं सांगितलं आहे की, तिने फक्त त्याचा अॅपल लॅपटॉप आणि घड्याळ घेतलं होतं, जे दोन्ही अभिनेत्याने भेट म्हणून दिलं होतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, “कोणतीही मालमत्ता बेईमानीने किंवा सुशांतच्या माहितीशिवाय मिळवल्याचे कोणतेही पुरावे दिसत नाहीत.”
रिपोर्टनुसार, सुशांत – रिया एप्रिल 2019 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि सुशांत सिंग राजपूतने स्वतः रिया चक्रवर्तीला ‘कुटुंबाचा भाग’ म्हणून सांगितलं होतं. त्यांच्याशी संबंधित खर्च सुशांत सिंग राजपूतच्या अकाउंटंट आणि वकिलाने त्यांच्या सूचनेनुसार उचलला होता आणि म्हणूनच त्यामध्ये फसवणूक किंवा पैशासाठी दबाव आणण्यासारखं नव्हतं. त्यामुळे सुशांतची दिशाभूल झाली नाही… असं देखील सीबीआय रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
रिया चक्रवर्तीने अभिनेत्याला बेकायदेशीरपणे कोंडून ठेवलं होतं, धमकी दिली होती किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं, या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सीबीआयने सांगितलं. अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल सांगायचं झालं तर, 14 जून 2020 मध्ये सुशांत याने स्वतःच्या घरात जीवन संपवलं.