
प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला कधीच दिसत नाही, आणि सोबत मुखवट्यामागे दडलेली अनेक रहस्य..!! या मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला की आपणही चक्रावून जातो. अशीच एक चक्रावून टाकणारी कथा आगामी ‘केस नं. 73’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे…. अशा टॅगलाइनसह आलेल्या ‘केस नं. 73’ चित्रपटाचं मोशन पोस्टर आपल्यासमोर असंख्य प्रश्न उभं करतं. लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. 73’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे.
या चित्रपटाचे सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील प्रत्येक प्रसंग एक नवं गूढ उलगडतो आणि प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल प्रश्न उभे करतो. “हा केवळ रहस्यमय चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल,” असं मत दिग्दर्शक डॉ.मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केलं. ‘मराठी चित्रपटसृष्टीतला रहस्यपटांचा दर्जा आणखी उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘केस नं. 73’ प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल,’ असा विश्वास निर्माते शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केला.
चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची आहे. मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचं आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ‘केस नं. 73’ कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार? हे पाहाणं रंजक ठरणार आहे.