मराठमोळ्या अभिनेत्याने ‘तारक मेहता’च्या 2 एपिसोडमधून सोडली छाप, नंतर गायब; आता कुठे आहे गफूर घिसेला?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत हा अभिनेता फक्त दोन एपिसोड्समध्येच झळकला होता. त्यातूनही त्याने विशेष छाप सोडली आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता 'थ्री इडियट्स'मध्ये चतूरची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा चुलत भाऊ आहे.

मराठमोळ्या अभिनेत्याने तारक मेहताच्या 2 एपिसोडमधून सोडली छाप, नंतर गायब; आता कुठे आहे गफूर घिसेला?
तारक मेहता.. मालिकेतील कलाकार
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2025 | 11:40 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकी काही भूमिका सध्या मालिकेत नाहीत किंवा त्या भूमिका साकारणारे कलाकार मालिकेचा भाग नाहीत. असं असलं तरी आजही ते प्रेक्षकांच्या आठवणीत कायम आहेत. अशीच एक भूमिका म्हणजे गफूर घिसेला. हे पात्र ‘तारक मेहता..’ मालिकेतील काही मोजक्याच भागांमध्ये दिसलं होतं. परंतु त्यातूनही त्याने विशेष छाप सोडली होती. त्याचे डायलॉग्स आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. विशेष म्हणजे एका मराठमोळ्या अभिनेत्याने हे पात्र साकारलं होतं. गफूर घिसेला हे पात्र त्याच्या डायलॉग्स आणि वन लाइनर्ससाठी प्रसिद्ध झालं होतं.

‘विदाऊट फोटो फ्रेम’, ‘विदाऊट शटर कव्हर’, ‘बिल्डिंग विदाऊट टेरेस’, ‘विदाऊट ज्यूस ऑफ बॉल्स’, ‘विदाऊट अकाऊंट बुक’ अशा अनेक वन लाइनर्समुळे गफूर घिसेला प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला होता. अभिनेता निलेश दिवेकरने ही भूमिका साकारली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एपिसोड क्रमांक 584 आणि 586 मध्ये तो दिसला होता. अनेकांना याबद्दल माहीत नाही की, निलेश हा ‘थ्री इडियट्स’ फेम ओमी वैद्यचा चुलत भाऊ आहे. आमिर खानच्या या गाजलेल्या चित्रपटात ओमीने सायलेन्सर म्हणजे चतुर रामलिंगमची भूमिका साकारली होती.

निलेश दिवेकरने विविध चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘फरारी की सवारी’ या चित्रपटात त्याने पक्याची भूमिका साकारली होती. निलेश हा मुंबईचाच रहिवासी आहे. लहानपणापासून तो मराठी रंगभूमीवरही कार्यरत होता. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, मराठी रंगभूमीवर त्याने जवळपास एक हजारहून अधिक नाटकांमध्ये काम केलंय. त्यानंतर तो हिंदी मालिकांकडे वळला होता. ‘तारक मेहता..’ शिवाय त्याने ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी इधर कभी उधर’, ‘फिल्मी चक्कर’ आणि ‘येस बॉस’सारख्या मालिकांमध्येही काम केलंय.

निलेशने आसिफ शेख, दिलीप जोशी, स्मृती इराणी, राकेश बेदी, टिकू तलसानिया आणि सतीश शाह अशा अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘विरुद्ध’ चित्रपटातही झळकला होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील सर्किटच्या भूमिकेसाठीही त्याने ऑडिशन दिलं होतं. परंतु नंतर अर्शद वारसीला ही भूमिका मिळाली होती. सर्किटच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली होती, परंतु अंतिम फेरीत त्याला वगळण्यात आलं होतं, असं निलेशने सांगितलं होतं.