
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची वापसी कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर कदाचित चाहत्यांना इतक्यात मिळणार आहे. परंतु दयाबेन सध्या कुठे आहे आणि काय करतेय, याचे अपडेट्स मात्र चाहत्यांना वारंवार मिळत आहेत. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे अभिनेत्री दिशा वकानीला परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु ती परत येणार की नाही, याचं उत्तर कदाचित त्यांनाही अद्याप माहीत नसेल. असं असलं तरी दिशा वकानी आणि असित मोदी यांच्यातील नातेसंबंध अजूनही खूप चांगले आहेत. याचा आणखी एक पुरावा रक्षाबंधननिमित्त चाहत्यांना मिळाला. दिशा तिच्या मुलींसोबत असित यांना राखी बांधायला त्यांच्या घरी गेली होती. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये असित मोदी आणि त्यांची पत्नी नीला मोदी दिसत आहेत. त्यांच्यासोबतच दिशा वकानी आणि तिच्या दोन मुलीसुद्धा पहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिशा जरी ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम करत नसली तरी असित मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत तिचं नातं खूप चांगलं आहे, हे या फोटोंमधून स्पष्ट पहायला मिळतंय.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका 2008 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेव्हापासून मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वकानीने साकारली होती. परंतु बाळंतपणासाठी तिने काही काळ ब्रेक घेतला होता. दिशाला दोन मुली आहेत. मुलींच्या जन्मानंतर दिशा तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाली. त्यामुळे तिने मालिकेत परत येण्याचा विचार केला नाही. प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून दयाबेनच्या कमबॅकची प्रतीक्षा करत आहेत. तर असित मोदीसुद्धा दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप मालिकेत दयाबेन परतलीच नाही.
‘तारक मेहता..’ ही मालिका या आठवड्यात टीआरपीच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेली ही मालिका अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. काही आठवड्यांपूर्वी टीआरपीच्या यादीत या मालिकेनं पहिला क्रमांक पटकावला होता. मालिकेच्या कथेतील हॉरर ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे अनेक लोकप्रिय मालिकांना मागे टाकत ‘तारक मेहता..’ अग्रस्थानी होती.