‘अखेर प्रतीक्षा संपली’, तब्बल 9 वर्षानंतर ‘तारक मेहता’मध्ये दयाबेन परत येणार, थेट समोर आला प्रोमो

'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल 9 वर्षानंतर दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अखेर प्रतीक्षा संपली, तब्बल 9 वर्षानंतर तारक मेहतामध्ये दयाबेन परत येणार, थेट समोर आला प्रोमो
| Updated on: Jul 12, 2026 | 4:40 PM

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. अभिनेत्री दिशा वकानी यांनी साकारलेल्या या भूमिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली. मात्र, 2017 मध्ये मातृत्व रजेवर गेल्यानंतर दिशा वकानी मालिकेत परतल्याच नाहीत. जवळपास नऊ वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये दयाबेन गोकुळधाम सोसायटीत परतणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रोमोमध्ये टप्पूची आनंदाची बातमी

प्रोमोच्या सुरुवातीलाच जेठालालचा मुलगा टप्पू अत्यंत आनंदाने घरात धावत येतो. तो बापूजी आणि जेठालाल यांच्यासमोर उत्साहाने, ‘आई येणार आहे का?’ असे विचारतो. हे ऐकताच जेठालालच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. आपल्या लाडक्या दयाच्या पुनरागमनाची शक्यता ऐकून तो अक्षरशः आनंदाने भारावून जातो. गोकुळधाम सोसायटीतही दयाबेनच्या स्वागताची चर्चा सुरू झाल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

दयाबेन परत येणार असल्याची चाहूल लागताच जेठालाल आपल्या जिवलग मित्र तारक मेहता यांच्याकडे धाव घेतो. यावेळी तो आनंद व्यक्त करत म्हणतो, ‘दया आली की तिच्या हातचा मस्त राजवाडी चहा पिणार.’ दयाच्या आगमनाच्या कल्पनेने जेठालाल, टप्पू आणि बापूजी आनंदात असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

सुंदरलाल पुन्हा शब्द फिरवणार?

मात्र, या आनंदाच्या वातावरणात प्रोमोमध्ये एक मोठा सस्पेन्सही ठेवण्यात आला आहे. तारक मेहता यांना मात्र या बातमीबद्दल शंका आहे. ते जेठालालला सांगतात की, मला वाटतं, यावेळीही सुंदरलाल दयाभाभींना घेऊन येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

दयाबेनच्या पुनरागमनाची चर्चा मालिकेत यापूर्वीही अनेकदा रंगली होती. प्रत्येक वेळी दयाबेनचा भाऊ सुंदरलाल जेठालालला दया परत येणार असल्याचे आश्वासन देत असे. मात्र, शेवटच्या क्षणी तो एकटाच गोकुळधाममध्ये पोहोचत असल्याने जेठालालसह प्रेक्षकांचीही निराशा होत असे. मालिकेच्या निर्मात्यांनी यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारचे कथानकातील ट्विस्ट आणले आहेत. त्यामुळे यावेळी खरोखरच दयाबेन मालिकेत पुनरागमन करणार की पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us