
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एक अशी मालिका आहे, ज्याचा आनंद संपूर्ण परिवार एकत्र बसून घेऊ शकतो. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये बरेच असे कलाकार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी लहानाचं मोठं होताना पाहिलंय. यामध्ये भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री निधी भानुशालीचाही समावेश आहे. निधीने बालकलाकार म्हणून या मालिकेत काम केलं होतं आणि सोनूच्या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ती या मालिकेचा भाग नाही. परंतु सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंवर तिचे काही चाहते नाराज झाले आहेत.
निधी सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. निधी तिच्या आईवडिलांसोबत गोव्याला फिरायला गेली होती. या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या आईवडिलांसोबत आणि भावासोबत एंजॉय करताना दिसून येत आहे. यातील काही फोटोंमध्ये ती बिकिनी घालून स्विमिंग पूलजवळ पोझ देताना दिसतेय. निधीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकीकडे निधीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो आवडत असून दुसरीकडे काही युजर्सनी तिला ट्रोल केलंय. एका फोटोमध्ये निधीसोबत तिच्या आईनेही मोनॉकिनी परिधान केल्याचं पहायला मिळतंय. त्यावरूनही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर आईवडिलांसमोर असे तोकडे कपडे घातल्याने निधीवरही काहींनी निशाणा साधला आहे.
‘आईलाही लाज वाटत नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आई-वडील आणि भावासमोर कसे कपडे घातले आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘संपूर्ण कुटुंबच अजब आहे’, असंही काहींनी लिहिलं आहे. निधीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे असे अनेक बोल्ट फोटो पहायला मिळतात. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.