‘तारक मेहता..’मध्ये बाघाची भूमिका साकारून चुकवावी लागतेय मोठी किंमत; तन्मयला सरळ उभं राहणंही कठीण
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गेल्या 14-15 वर्षांपासून बाघाची भूमिका साकारण्याची मोठी किंमत अभिनेता तन्मय वेकारियाला चुकवावी लागत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला. मात्र यामध्ये बाघाची भूमिका साकारून मोठ्या शारीरिक समस्येचा सामना करावा लागल्याचा खुलासा अभिनेता तन्मय वेकारियाने केला आहे. तन्मय गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करतोय. त्याच्या भूमिकेची देहबोली आणि शरीरयष्टी विशिष्ट प्रकारची असल्याने त्याला शूटिंगचा संपूर्ण वेळ तसंच उभं राहावं लागतं. यामुळे पाठदुखीचा प्रचंड त्रास होत असल्याचं त्याने म्हटलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तन्मय याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. बाघाची भूमिका साकारून पाठीवर प्रचंड दबाव येत असल्याचं त्याने म्हटलंय.
सरळ उभं राहणंही कठीण
‘टेलीचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत तन्मय म्हणाला, “इतक्या वर्षांपासून मालिकेत बाघाची भूमिका साकारल्यानंतर आता सरळ उभं राहिलं तरी माझी पाठ दुखते. पण मला ही भूमिका साकारायला खूप आवडते. एकदा का मी सेटवर या भूमिकेत शिरलो की, मी कुठल्याच वेदनांचा विचार करत नाही. मी फक्त त्या क्षणांचा आनंद घेतो. मी सेटवर खूप खुश असतो आणि तिथे वातावरणही तसंच असतं. याच कारणामुळे कदाचित आम्ही प्रेक्षकांना इतक्या वर्षांपासून मनोरंजक एपिसोड्स देऊ शकतोय.”
वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळ
सेटवर पूर्ण मेहनतीने काम करणारा तन्मय गेल्या काही दिवसांपासून खऱ्या आयुष्यात अत्यंत कठीण काळाचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील आणि प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद वेकारिया यांचं निधन झालं. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तन्मयच्या आईचंही निधन झालं होती. तन्मयच्या बाघा या भूमिकेची त्याची आई सर्वांत मोठी चाहती होती. आपल्याला मुलाला त्या भूमिकेत पहायला त्यांना खूप आवडायचं. पण आता आई माझे नवीन एपिसोड्स पाहू शकणार नाही, हे आठवून तन्मय एकदा सेटवर भावूक झाला होता.
अशी मिळाली बाघाची भूमिका
‘तारक मेहता..’ या मालिकेच्या आधी तन्मयने छोट्या-मोठ्या भूमिकासुद्धा साकारल्या आहेत. त्याला एका मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मिळणार होती, मात्र मालिकेशी संबंधित एका व्यक्तीने त्याला बाघाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला होता. तन्मयने ही ऑडिशन दिली आणि त्याची निवडसुद्धा झाली. तेव्हापासून तो बाघाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.