250 वेळा ऑडिशन दिलं पण मिळाला नकार, शेवटी एका भूमिकेने बदललं आयुष्य, आज इंडस्ट्रीवर करतोय राज्य
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील असा एक कलाकार ज्याने 250 वेळा ऑडिशन दिलं मात्र, प्रत्येक वेळी त्याला मिळाला नकार. मात्र, एका भूमिकेने बदललं आयुष्य. आज चित्रपट आणि सीरिजमधून करतेय प्रेक्षकांच्या मनावर राज्य.

चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी अनेक कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. यामध्ये काही कलाकारांच्या कथा प्रेरणादायी ठरतात तर काहींच्या संघर्षानेच त्यांची ओळख घडते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे ताहिर राज भसीनची. ज्याने तब्बल 250 पेक्षा जास्त वेळा रिजेक्शन सहन केल्यानंतर इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले.
21 एप्रिल रोजी ताहिर राज भसीन आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिल्लीमध्ये जन्मलेल्या ताहिरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याने University of Melbourne येथून मीडियाचे शिक्षण घेतले आणि सुरुवातीला एका न्यूज कंपनीत नोकरीही केली. मात्र, अभिनयाची ओढ त्याला मुंबईकडे घेऊन आली.
250 वेळा मिळाला नकार
मुंबईत आल्यानंतर त्याने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले, मात्र सुरुवातीचा प्रवास खूप कठीण होता. अनेक ऑडिशन्स दिल्यानंतरही त्याला सतत नकार मिळत राहिला. त्याने स्वतः सांगितल्याप्रमाणे, चित्रपट, जाहिराती आणि इतर प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी त्याने 250 पेक्षा अधिक वेळा ऑडिशन्स दिले, पण प्रत्येक वेळी त्यांना रिजेक्शनच मिळाले.
या कठीण काळानंतर त्याला मोठी संधी मिळाली ती Mardaani या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी राणी मुखर्जी सोबत खलनायकाची भूमिका साकारली. त्याच्या दमदार अभिनयामुळे तो प्रेक्षकांच्या नजरेत भरला आणि त्याला खरी ओळख मिळाली.
मर्दानी चित्रपटातून मिळाली ओळख
ताहिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मर्दानी’च्या ऑडिशनपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जवळपास चार वर्षे लागली. या काळात मिळालेल्या प्रत्येक नकाराने त्याला काहीतरी शिकवले आणि त्याच अनुभवाचा उपयोग त्याने ‘मर्दानी’मध्ये केला. यानंतर ताहिर राज भसीनने 83, Chhichhore, Manto आणि Force 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच त्याने अनेक वेब सिरीजमध्येही आपली छाप सोडली आहे.
आज ताहिर राज भसीन हे मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे नाव बनले आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.