
‘बिग बॉस’चा प्रत्येक सिझन ड्रामाने भरलेला असतो. अनेक सेलिब्रिटींना या वादग्रस्त शोची ऑफर दिली जाते. त्यापैकी काहीजण भरभक्कम मानधन स्वीकारून बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात. तर काहींना कितीही मोठी ऑफर दिली तरी ते या शोपासून लांब राहणंच पसंत करतात. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या शोकडून मिळालेल्या ऑफरविषयी खुलासा केला. बिग बॉसच्या निर्मात्यांनी तिला अनेकदा ऑफर दिली होती, परंतु तनुश्रीने ती साफ नाकारली. “मला माझ्या खासगी आयुष्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी माझ्या सिद्धांताशी तडजोड करू शकत नाही” असं तिने सांगितलं.
‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली, “मी गेल्या 11 वर्षांपासून बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापासून नकार देत आहे. ते दरवर्षी मला ऑफर देतात आणि दरवर्षी मी त्यांना नकार देते. मी अशा जागी राहू शकत नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबतही राहत नाही. बिग बॉसवाल्यांनी मला तब्बल 1.65 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. कारण त्यांनी आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीला इतकी मोठी रक्कम दिली होती. तीसुद्धा माझ्याच लेव्हलची अभिनेत्री होती. मला त्याहूनही अधिक रक्कम मिळाली असती, परंतु मी थेट नकार दिला.”
“बिग बॉसच्या निर्मात्यांनी मला चंद्र जरी आणून दिला, तरी मी तिथे जाणार नाही. महिला आणि पुरुष एकाच ठिकाणी एकाच बेडवर झोपतात, एकाच ठिकाणी भांडतात.. हे सर्व मी करू शकत नाही. मी माझ्या डाएटबद्दल खूप सजग असते. ते माझ्याबद्दल असा विचारच कसा करू शकतात की मी काही पैशांसाठी एकाच बेडवर एखाद्या पुरुषासोबत झोपेन. मी इतकी नीच नाही. मला त्यांनी कितीही कोटी रुपये दिले तरी मी तिथे जाणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका तनुश्रीने मांडली आहे.
बिग बॉसच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम अभिनेत्री पामेला अँडरसनला देण्यात आली होती. या शोच्या चौथ्या सिझनमध्ये ती झळकली होती आणि फक्त तीन दिवसांसाठी तिला अडीच कोटी रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस 14’मध्ये अली गोणीने वाइल्ड कार्ड एण्ट्री करत दर आठवड्याला 16 लाख रुपये कमावले होते. एकूण त्याला 2.8 कोटी रुपये मिळाले होते. याशिवाय रिमी सेनलाही ‘बिग बॉस 9’साठी दोन कोटी रुपये देण्यात आले होते.