श्रावणातला उपवास सोडताना तनुश्रीने खाल्लं चक्क मटण; भडकले नेटकरी, म्हणाली ‘हे सर्वोत्तम..’
श्रावणातील उपवास सोडताना अभिनेत्री तनुश्री दत्ताने मटण खाल्लं आहे. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. यावरून नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. परंतु ट्रोलर्सना तनुश्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. मटण खाण्यामागचं कारण तिने सांगितलं आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करत तिच्याच घरात तिचा छळ होत असल्याचा आरोप केला होता. यामुळे माझ्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत असल्याचंही तिने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर 2018 पासून मला त्रास दिला जात असल्याचाही आरोप तनुश्रीने केला होता. आता तनुश्री तिच्या आणखी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये तिने म्हटलंय की, “तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडत असेल तर तुमच्या आवडीचे पदार्थ खा, जसं की मी आज मटण खाणार आहे.” यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रावण महिन्यात मांसाहार खाण्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. या ट्रोलर्सना तनुश्रीने उत्तरसुद्धा दिलंय.
तनुश्रीने पोस्ट शेअर करत सांगितलं की तिने श्रावणातील उपवास केला होता आणि संध्याकाळी 7 वाजता उपवास सोडला होता. उपवास सोडताना तिने भात, काळी डाळ आणि मटण खाल्लं होतं. तिच्या मते, जेवणातील हे कॉम्बिनेशन तिच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे आणि बंगाली असल्याने तिच्या सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि आयुर्वेदिक पोषण या दोन्हींनुसार ते चांगलं आहे.

याविषयी ती पुढे म्हणाली, “असा उपवास माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. उपवाससुद्धा होतो, उपवासाने मानसिक शक्ती वाढते आणि मग उपवास सोडताना हाय प्रोटीन आणि पौष्टिक भोजनसुद्धा खाल्लं जातं. त्यामुळे शरीरसुद्धा नेहमी निरोगी राहतं. बंगालमध्ये सर्वजण अशाच पद्धतीने उपवास सोडतात. आम्ही संध्याकाळपर्यंत फक्त पाणी पिऊन उपवास करतो आणि सूर्यास्तानंतर देवीला नैवेद्य दाखवून बकरीचं मांस खातो. प्रत्येक संस्कृती वेगळी असते. त्यामुळे कोणावरही टीका करू नका. संपूर्ण व्हिडीओ पहा आणि त्यानंतर टिप्पणी द्या. इथं धार्मिक लोक फक्त त्यांच्या दुष्ट विचारणीसह येतात.”
काही दिवसांपूर्वी तनुश्रीने एक व्हिडीओ पोस्ट करत आरोप केला की, “काही लोक मला फॉलो करत आहेत. मला त्रास देण्यासाठी हे सर्व केलं जातंय. माझ्या दारासमोर काहीही ठेवून जातात. माझ्या घरात सतत वरून ड्रिलिंगचा आवाज येतो. मला वेडं बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आला आहे. त्यामुळे मी कुठे जाते, काय करते हे सर्व लोकांना समजतंय. माझी अवस्था सुशांत सिंह राजपूतसारखी केली जात आहे.”
