
‘बिग बॉस 19’ सुरू झाला असून त्यातील काही स्पर्धक पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यापैकीच एक आहे इन्फ्लुएन्सर आणि स्वयंघोषित बिझनेसवुमन तान्या मित्तल. बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून तिने तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांविषयी असे काही खुलासे केले आहेत, जे ऐकून इतर सर्व स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तान्या सतत तिच्या श्रीमंतीचा बडेजाव करताना दिसते. माझा आणि माझ्या कुटुंबीयांचे खूप मोठे व्यवसाय आहेत, आमच्या घरात प्रत्येक व्यक्तीला बॉडीगार्ड आहे, मला सर्वजण ‘बॉस’ असंच म्हणतात.. अशा बढाया तान्याने इतर स्पर्धकांसमोर मारल्या आहेत. तिच्या याच सर्व दाव्यांना आता एका बाहेरच्या व्यक्तीने खोटं म्हटलंय.
‘लव स्कूल’ या रिअॅलिटी शोचा माजी स्पर्धक आणि कंटेंट क्रिएटर माधव शर्माने तान्याबद्दल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने तान्याच्या श्रीमंतीची पोलखोल केली आहे. “तान्या मित्तल कोण आहे, ती काय करते, तिची सर्व सिस्टिम कशी आहे, याची मी माहिती काढली आहे. सर्वांत आधी बॉडीगार्ड आणि सिक्युरिटीबद्दल बोलुयात. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन ग्वालियरचाच आहे आणि तो सतत तिथे ये-जा करत असतो. त्याचे आई-वडील तिथेच राहतात. त्याला आजपर्यंत कधी बॉडीगार्डची गरज पडली नाही. तान्याला ग्वालियरमध्ये कोणीच ओळखत नाही. मी तिच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते मलाच विचारत होते की ही कोण आहे? तिची फॅक्ट्री आणि व्यवसाय इतका मोठा नाही, जितका ती दावा करतेय”, असं त्याने सांगितलं.
‘बिग बॉस 19’मधील काही स्पर्धक पहिल्या तीन दिवसांतच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यापैकीच एक तान्या मित्तल आहे, जी पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर ट्रोल होतेय. शोमध्ये येताच तान्याने सांगितलं की ती एक स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर आहे. हे ऐकून प्रेक्षकांना आणि घरातील इतर स्पर्धकांना असं वाटलं की ती खूप साधी आणि विनम्र असेल. परंतु ज्याप्रकारे तिने काही वक्तव्ये केली आहेत, ते प्रेक्षकांना आणि सदस्यांनाही अजिबात आवडली नाहीत. त्यावरून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तर तिला ‘शो ऑफ क्वीन’चा टॅग दिला आहे.