सुंदर नाहीस म्हणत BF ने केला ब्रेकअप; ट्रान्सफॉर्मेशनसाठी नको नको ते केलं, आता ‘बिग बॉस 19’मध्ये एण्ट्री
बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या या इन्फ्लुएन्सरची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ती तिच्या ब्रेकअपबद्दल मोकळेपणे बोलतेय. तू सुंदर नाहीस म्हणून बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्याचा खुलासा तिने केला.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिझनेसवुमन तान्या मित्तलने ‘बिग बॉस 19’मध्ये धमाकेदार एण्ट्री केली. महाकुंभदरम्यान तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता बिग बॉसमध्ये ती तिच्या बडेजाव करण्याच्या स्वभावामुळे चर्चेत आली आहे. पहिल्याच दिवसापासून तान्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच तिच्या एका पॉडकास्ट मुलाखतीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 2018 मध्ये बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचा खुलासा तिने केला. यामागचं कारणंही तिने सांगितलं आहे.
या मुलाखतीत तान्या सांगते, “2018 मध्ये माझा ब्रेकअप झाला होता. मी फार सुंदर दिसत नाही, म्हणून त्याने नातं तोडलं होतं. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणती असूच शकत नव्हती. कारण त्याच्यासाठी मी कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून आली होती. मी माझ्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मला असं वाटलं होतं की, जगात माझी साथ कोणीच नाही दिली तरी तो नक्की देणार. काहीच शक्य झालं नाही तर मी त्याच्याशी लग्न करेन, असा विचार केला होता. लग्न करून पत्नीच्या सर्व जबाबदाऱ्या चोख पाळेन आणि आम्ही कायम एकमेकांसोबत राहू, असं वाटलं होतं.”
View this post on Instagram
“अचानक एकेदिवशी तो मला म्हणाला की तू सुंदर नाही दिसत. असं बोलून त्याने माझ्याशी ब्रेकअप केला. त्याचा सूड घेण्यासाठी मला सुंदर व्हावं लागलं. मी 15 किलो वजन कमी केलं. बेसन-दहीने स्वत:ला रगडलं. मग मला समजलं की ब्युटी ट्रीटमेंट्ससुद्धा असतात. लोक म्हणाले की दिल्लीला जा, व्हिटामिन सी खा, ग्लूटाथियोन खा. मी सर्व प्रयत्न केले. मला काहीही करून सुंदर व्हायचं होतं, ज्या कारणामुळे त्याने माझ्याशी ब्रेकअप केला होता. आता जेव्हा लोक मला म्हणतात की तू सुंदर दिसतेस, तेव्हा असं वाटतं की माझा सूड पूर्ण झाला आहे”, असं ती पुढे म्हणते.
‘बिग बॉस 19’च्या घरात आल्यापासून तान्या तिच्या स्वभावामुळे आणि सतत मोठेपणा सांगण्यामुळे चर्चेत आली आहे. “माझ्या घरी सर्वजण मला ‘बॉस’ म्हणतात. माझा भाऊसुद्धा मला बॉस म्हणूनच हाक मारतो. कारण मला ते आवडतं. मला माझ्या नावाने कोणीच बोलवत नाही. आमच्या घरातील प्रत्येक सदस्याचे बॉडीगार्ड्स आहेत. माझ्या बॉडीगार्ड्सनी महाकुंभममध्ये अनेकांचे प्राण वाचवले आहेत”, असं ती बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना सांगताना दिसते. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोलसुद्धा केलंय.
