
मुंबईतील एका कॉन्सर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांची जोडी नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय ठरली होती. आता डेटिंगच्या अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे. याला गायक एपी ढिल्लोचा कॉन्सर्टच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. ‘फिल्मफेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार, तारा आणि वीरने सहमताने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. परंतु एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओनंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याने, नेटकऱ्यांनी त्याच्याशी संबंध जोडला आहे. या ब्रेकअपच्या चर्चांवर अद्याप तारा किंवा वीरने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
तारा आणि तिचा बॉयफ्रेंड वीर पहारिया हे काही दिवसांपूर्वी मुंबईत एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टला पोहोचले होते. एपी ढिल्लोच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकल्याने ताराने त्याच्यासोबत कॉन्सर्टमध्ये स्टेज शेअर केला होता. स्टेजवर तिने एपीला मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस केलं. त्यानंतर त्यानेही तिला मिठी मारत किस करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडताना वीर पहारियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळालं होतं. अनेकांनी त्यावरून मीम्स व्हायरल केले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ फेक असल्याचं ताराने नंतर स्पष्ट केलं. तारा आणि वीरचा मित्र ऑरी यानेसुद्धा त्याच्या इन्स्टाग्रामवर कॉन्सर्टमधील ‘लाइव्ह’ व्हिडीओ पोस्ट करत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं. इतकंच नव्हे तर ताराने असाही आरोप केला आहे की तिच्याविरोधात नकारात्मक पीआर मोहीम राबवली जात आहे. तिला बदनाम करण्यासाठी असे अपमानास्पद कॅप्शन बनवण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
‘हे सर्व पैसे देऊन एडिट करवून घेतले आहेत. माझा अपमान करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं आहे. हे अत्यंत घृणास्पद आहे की त्यांनी शेकडो कंटेंट क्रिएटर्स आणि हजारो मीम पेजेसना पाठवण्यासाठी अपमानास्पद कॅप्शन आणि चर्चेच्या पॉईंट्सची एक यादीच तयार केली होती. हे सर्व माझं करिअर आणि नातं उद्ध्वस्त करण्यासाठी केलंय का,’ असा सवाल तिने केला होता. परंतु त्यानंतर आता तारा आणि वीरचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय. हे दोघं जून 2025 पासून एकमेकांना डेट करत होते.