
दिवाळीनिमित्त अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांची जोडी विशेष चर्चेत आली आहे. मनिष मल्होत्राच्या पार्टीत या दोघांनी एकत्र येत रिलेशनशिपमध्ये असल्याचं अप्रत्यक्षपणे जाहीर केलं होतं. त्यानंतर ताराने सोशल मीडियावर वीरसोबतचे रोमँटिक फोटोसुद्धा पोस्ट केले होते. वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तर वीरचा भाऊ शिखर पहारिया हा अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करतोय. त्यामुळे जान्हवी आणि तारा या दोघी सुशीलकुमार शिंदेंच्या नातसून होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघींपैकी कोण सर्वाधिक श्रीमंत आहे, कोणाकडे किती संपत्ती आहे.. ते जाणून घेऊयात..
बॉलिवूड इंडस्ट्रीत जान्हवी कपूर आणि तारा सुतारिया यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघींनी 2018-19 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे. तर ताराने टेलिव्हिजन विश्वातून बॉलिवूडकडे वाटचाल केली आहे. सौंदर्याच्या बाबतीत या दोघींचा मोठा चाहतावर्ग आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी 28 वर्षांची असून तिने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
जान्हवीने ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’, ‘रुही’, ‘मिली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘देवारा’ या दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलंय. जान्हवी एका चित्रपटासाठी दहा ते पंधरा कोटी रुपये मानधन स्वीकारते. तर मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही ती चांगली कमाई करते. याच कमाईतून जान्हवीने मुंबईत आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं. याशिवाय तिच्याकडे महागड्या गाड्यांचंही कलेक्शन आहे. जान्हवीकडे जवळपास 82 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
दुसरीकडे तारा सुतारियानेही वयाच्या 29 व्या वर्षी इंडस्ट्रीत बरंच नाव आणि प्रसिद्धी कमावली आहे. मुंबईतील एका पारसी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर विविध मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. 2019 मध्ये ताराने ‘स्टुडंड ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मरजावां’, ‘तडप’, ‘हिरोपंती 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
तारा सुतारियाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, ती जान्हवी कपूरच्या तुलनेत खूपच मागे आहे. तारा एका चित्रपटासाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये मानधन स्वीकारते. त्याचसोबत विविध जाहिरातींमधून तिची कमाई होते. ताराची एकूण संपत्ती 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. तिच्याकडे मर्सिडीज आणि ऑडीसारख्या आलिशान गाड्यासुद्धा आहेत.