Marathi Serial : ‘शिक्षक ते अभिनेता…’,वाचा रघू म्हणजेच संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

| Updated on: Jan 11, 2021 | 7:14 PM

संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. ('Teacher to Actor', a shocking journey of Sanchit Chaudhary)

Marathi Serial : शिक्षक ते अभिनेता…,वाचा रघू म्हणजेच संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास
Follow us on

मुंबई: गेले अनेक दिवस ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’या मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. खूप कमी वेळात या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेच्या कथेसोबतच यातील पात्रसुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. त्यामुळे रघू आणि स्वातीचं फॅनफॉलोइंग आता मोठं झालंय.

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा आहे. त्याचे वडील शिक्षक असल्यामुळे संचितनंही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. संचितनं सायकॉलॉजीमध्ये एम.ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली. मात्र संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्यानं नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं.

अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्यानं पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली. स्टार प्रवाहवरील प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे. ‘रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो’ हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा या रघूचं स्वातीवर जीवापाड प्रेम आहे. स्वाती रघूच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.