
अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची आई आणि मराठी नाटक, सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. आज (17 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्योती चांदेकर या मूळच्या पुण्याच्या होत्या. आईच्या निधनानंतर तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आईच्या निधनाविषयी आणि अंत्यसंस्काराविषयीची माहिती दिली आहे.
‘नमस्कार, कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसंच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या 69 व्या वर्षी आज 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथं होणार आहेत’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
एका हिंदी चित्रपटातील छोट्याशा भूमिकेनं त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली होती. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘एक नजर’ या चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी त्या वडिलांसोबत गेल्या होत्या. दिग्दर्शकाने दिलेल्या काही ओळी सहजगत्या वाचल्यानंतर ‘या मुलीला मेकअप करण्यासाठी न्या’ असं दिग्दर्शकाने सांगताच त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी ‘सुंदर मी होणार’, ‘करायला गेलो एक’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’ यांसारख्या नाटकांमध्येही काम केलंय.
मुंबईत राहण्याची सोय नसल्याने ज्योती चांदेकर यांना नाटकात घेणं निर्मात्यांना अडचणीचं ठरायचं. मात्र पुण्यामध्ये ‘रखेली’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ ही त्यांची नाटकं विशेष गाजली होती. ‘मित्र’ या नाटकामध्ये त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत साकारलेली भूमिका लक्षणीय ठरली होती. ज्योती चांदेकर यांनी ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.