
स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरुषांनी स्त्रियांच्या सायकोलॉजीबद्दल समजून घेतलं आणि स्त्रियांनीही त्यांच्या दृष्टीकोनाचा विचार केला, तर बरेच वाद कमी होऊ शकतात. यासाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खूप चांगलं उदाहरण सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या विषयावर मोकळेपणे व्यक्त झाली. पुरुष आणि पुरुषांच्या सायकोलॉजीबद्दल समजून घेतल्याने, माझं ‘उडत गेला’ असं होत नाही, असंही तिने म्हटलंय. तिची ही मुलाखत चांगलीच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
“मी स्त्री आणि पुरुषांच्या सायकोलॉजीविषयी एक व्हिडीओ बघितला होता. त्याच्यामध्ये तिने एक खूप साधं उदाहरण दिलं होतं. त्यात बायको स्वयंपाक करते आणि ती नवऱ्याला म्हणते की मला बटाटे चिरून दे. तर नवरा बटाटे चिरतो आणि तिला देतो. आता ती तेव्हा मागे वळून बघते, तेव्हा नवऱ्याने बटाट्याची सगळी सालं तिथेच ठेवलेली असतात. कापलेली बटाटेसुद्धा तिथेच आहेत, चॉपिंग बोर्डही तिथेच आहे आणि सगळा पसारा झालाय. आता तिने बटाटे चिरून मागितले होते, तर त्याने ते काम केलंय. ती म्हणते, अरे तू माझं काम वाढवलंस, कमी नाही केलंस”, असं तिने सांगितलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “पुरुषांना एक, दोन, तीन, चार.. असं सांगायला लागतं. बटाटे काप, त्याची सालं सगळी कचऱ्याच्या डब्यात टाक, तो चॉपिंग बोर्ड धुवून ठेवून दे. पण त्याने काय ऐकलं, बटाटे काप. त्याने त्याचं काम केलं. पण स्त्रियांना असं अपेक्षित असतं की त्याने हे ही करावं. कारण ती गोष्ट स्त्रियांच्या अंगवळणी आहे. काही गोष्टी स्त्रियांच्या अंगवळणी असतात. त्यामुळे त्या शंभर गोष्टी एकत्र मॅनेज करू शकतात. पुरुष नाही करू शकत. माझ्या मते, ही एकमेकांना समजण्याची गोष्ट आहे. कदाचित मी इतकं पुरुषाला समजते, त्यामुळे माझं ते ‘उडत गेला’ होत नाही. माझं असं होतं की ठीक आहे. ‘सोन्या..’ हे एवढंच माझं होतं.”
यावर अभिनेता सुमीत राघवननेही कमेंट केली आहे. “नाही पटत. जनरलाइज नका करू. स्त्रिया करू शकतात आणि पुरुष नाही करत, हे स्टेटमेंट पटत नाही”, असं त्याने लिहिलंय.