Me Honar Superstar: ‘मी होणार सुपरस्टार’मध्ये कोण मारणार बाजी? यादिवशी रंगणार महाअंतिम सोहळा

मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

Me Honar Superstar: ‘मी होणार सुपरस्टार’मध्ये कोण मारणार बाजी? यादिवशी रंगणार महाअंतिम सोहळा
Me Honar Superstar
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 8:22 AM

गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचं टॅलेण्ट सिद्ध करता यावं यासाठी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने हक्काचा मंच उभारला. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा (Me Honar Superstar) हा प्रवास सुरू झाला. वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी चार वर्षांच्या चिमुरड्यापासून 70 वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील दोन सर्वोत्तम गायक आणि दोन ग्रुप्सनी आता महाअंतिम फेरी (Grand Finale) गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 21 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे.

मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे. महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांमधली महाजुगलबंदी पाहायला मिळणारच आहे आणि सोबतीला दगडी चाळ 2 च्या टीमने खास हजेरी लावत या सोहळ्याची शान वाढवली आहे. ‘मी होणार सुपरस्टार’चा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजेच 21 ऑगस्टला रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळली. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री याने सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीलाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्राभरातून आधी 71 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या 71 जणांमधून 26 स्पर्धक मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले होते. त्यापैकी आता दोन सर्वोत्तम गायक आणि दोन ग्रुप्सनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे.