Karan Mehra: करण मेहराला जीवे मारण्याच्या धमक्या, पत्नी निशाचे भावासोबतच अफेअर असल्याचा केला गंभीर आरोप

करण मेहराने सांगितलं की, निशा रावल आणि रोहित सेठिया यांच्याकडून सतत मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

Karan Mehra: करण मेहराला जीवे मारण्याच्या धमक्या, पत्नी निशाचे भावासोबतच अफेअर असल्याचा केला गंभीर आरोप
Nisha Rawal and Karan Mehra
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 11:25 AM

एकेकाळी टेलिव्हिजनवरील ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जाणारे निशा रावल (Nisha Rawal) आणि करण मेहरा (Karan Mehra) आता एकमेकांवर गंभीर आरोप करताना करताना दिसत आहेत. गेल्या वर्षी निशाने करण आणि त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर करणला अटकही करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. सध्या दोघंही घटस्फोट (Divorce) आणि मुलगा कविशचं पालकत्व मिळवण्यासाठी न्यायालयात लढा देत आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान करण मेहराने 4 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत निशावर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले आहेत. करणने पत्नी निशा रावलबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अजून घटस्फोट झालेला नाही आणि निशाचं मानलेला भाऊ रोहित सेठियासोबत अफेअर सुरू आहे, असं त्याने म्हटलंय. हे दोघंही एकत्र राहत आहेत, असंही करणने सांगितलं. निशाचे रोहित सेठियासोबत भाऊ-बहिणीचं नातं होतं, पण आता दोघंही अफेअरमध्ये आहेत, असं तो म्हणाला.

“एकीकडे भाऊ-बहिणीचं नातं आहे, तर दुसरीकडे त्याने निशाचं कन्यादान केलं होतं. निशाचे रोहित सेठियासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. हे सगळं मी आधी सांगू शकलो नसतो. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत गेल्या वर्षी घडल्या आहेत. त्यावेळी मी म्हणालो असतो, तर सर्वांनी उलट अर्थ काढला असता की पत्नीने त्याच्यावर आरोप केले आहेत, त्या बदल्यात तोसुद्धा तेच करत आहे. सर्व पुरावे गोळा करण्यासाठी 14 महिने लागले आहेत. हे सर्व माझ्या मुलासमोर घडलंय”, असा खुलासा करणने केला. करण मेहराने सांगितलं की, निशा रावल आणि रोहित सेठिया यांच्याकडून सतत मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याला अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तो जवळपास 14 महिन्यांपासून निशाविरुद्ध पुरावे गोळा करत आहे.

आरोपांवर निशा रावलची प्रतिक्रिया

करणने केलेल्या या आरोपांवर ‘पिंकविला’ या वेब साईटशी बोलताना निशा म्हणाली, “मी यावर काहीही भाष्य करू इच्छित नाही. मला माहित आहे की त्याने पत्रकार परिषदेत बरेच आरोप केले आहेत. पण मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही.” करणकडून गंभीर आरोप होऊनही निशाने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

गेल्या वर्षी मे महिन्यात निशा रावलने पती करणविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून एफआयआर दाखल केला होता. एवढंच नाही तर निशाने तिच्या पतीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोपही केला होता. मात्र ​​करणने त्यावेळी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.