Tu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील माई मावशीने जिंकली प्रेक्षकांची मनं, सोशल मीडियावर होतेय चर्चा

| Updated on: May 18, 2022 | 1:14 PM

उज्वला जोग यांना अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं. त्यांना माई मावशी या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

Tu Tevha Tashi: तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशीने जिंकली प्रेक्षकांची मनं, सोशल मीडियावर होतेय चर्चा
Ujjwala Jog
Image Credit source: Tv9
Follow us on

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. या मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं. ही भूमिका अभिनेत्री उज्वला जोग (Ujjwala Jog) अगदी चोख साकारत आहेत. उज्वला जोग यांना अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं. त्यांना माई मावशी या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. 20 मार्चपासून ही मालिका सुरू झाली असून यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय.

या बद्दल बोलताना लाली मावशी म्हणाल्या, “प्रत्येक घरात माई मावशीसारखं एक व्यक्तिमत्व हे असतंच आणि असलंच पाहिजे असं मला वाटतं. वेगवेगळ्या नात्याच्या रूपात प्रत्येकाच्या आयुष्यात एक माई मावशी सारखी कोणीतरी असते. मग ती आई, काकी, आत्या किंवा शेजारची काकू देखील असू शकते. ही व्यक्तिरेखाच इतकी गोड आहे की मला प्रेक्षकांकडून या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला अनेक प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रियांद्वारे सांगतात की त्यांना माई मावशी खूप आवडतेय.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

माई मावशी आणि लाली मावशीमधील साम्य सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “माई मावशीही थोडीशी फटकळ असली तरी ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. तिचा धाक आहे पण ती तेवढीच प्रेमळ पण आहे. मी देखील खऱ्या आयुष्यात तशीच आहे. त्यामुळे माई मावशी साकारताना मला मी जशी खरी आहे तेच मला साकारायचं असतं. कधी कधी स्क्रिप्ट वाचताना देखील मला असं वाटतं की हे किती पात्र किती माझ्यासारखंच आहे.”