Hardeek Joshi: ‘तुला जाऊन 2 वर्षे झाली, आजही..’; हार्दिक जोशीची भावूक पोस्ट

आपल्या जिवाभावाच्या मित्रासाठी त्याने ही खास पोस्ट लिहिली आहे. दोन वर्षांपूर्वी हार्दिकच्या या मित्राने जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. त्याच्याच आठवणीत भावूक झालेल्या हार्दिकने ही पोस्ट लिहिली आहे.

Hardeek Joshi: तुला जाऊन 2 वर्षे झाली, आजही..; हार्दिक जोशीची भावूक पोस्ट
Hardeek Joshi
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 11:28 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘राणा दा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशीची (Hardeek Joshi) सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. आपल्या जिवाभावाच्या मित्रासाठी त्याने ही खास पोस्ट लिहिली आहे. दोन वर्षांपूर्वी हार्दिकच्या या मित्राने जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. त्याच्याच आठवणीत भावूक झालेल्या हार्दिकने ही पोस्ट लिहिली आहे. हार्दिकचा पाळीव श्वान ‘बडी’ (Buddy) याच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हार्दिकने त्याच्यासोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. ‘मिस यू बडी.. माझा भाऊ, माझा मस्तीखोर मुलगा, माझा मित्र, माझा साथीदार’, अशा शब्दांत हार्दिकने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हार्दिकची पोस्ट-

‘मिस यू बडी.. माझा भाऊ, माझा मस्तीखोर मुलगा, माझा मित्र, माझा साथीदार. आज तुला जाऊन दोन वर्षे झाली, पण ती घटना आजच घडल्यासारखा भास होतो’, असं त्याने लिहिलंय. याआधीही हार्दिकने बडीसाठी खास पोस्ट लिहिली होती. ‘तुझी उणीव आजही आम्हाला नेहमी जाणवते. तू कायम आमच्यासोबत आहेस आणि राहणार’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या. पाळीव प्राण्यांमध्ये माणसाच्या सर्वांत जवळचा असलेला प्राणी म्हणजे श्वान. प्रामाणिक साथीदार, माणसाचा खरा मित्र अशी अनेक विशेषणं त्याला लावली जातात. हार्दिकसाठीही त्याचा बडी अत्यंत जवळचा होता.

पहा फोटो-

हार्दिकच्या या पोस्टवर अक्षया देवधरने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. दरम्यान, हार्दिक आणि अक्षया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक आणि अक्षयाने एकत्र काम केलं होतं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. हार्दिक सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय.