
'लाखात एक आमचा दादा' मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. सूर्यादादाच्या लाडक्या बहिणीच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. घरात तेजुच्या संगीत सोहळ्याची तयारी सुरू आहे.

संगीत सोहळ्यात तुळजा आणि सुर्याचं रोमँटिक परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर बहिणींचे परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हे सगळं होत असताना पोलीस पिंट्याला शोधण्यासाठी सुर्याच्या घरी पोहोचतात.

जालिंदर त्यांना तिथून निघून जाण्यास सांगतो. तेजू उद्या लग्न करून घरातून निघून जाणार या विचाराने सूर्या भावूक होतो. दरम्यान, जालिंदरला बातमी मिळते की पिंट्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला आहे. शत्रू गावात येणारी सगळी वर्तमानपत्रं जाळून टाकतो. मात्र सूर्याच्या घरी एक वर्तमानपत्र पोहोचतं, ज्यात पिंट्याचा फोटो आहे.

सूर्या आपल्या बहिणींकरिता एक सुंदर गाणं गातो, ज्यामुळे सगळे भावूक होतात. जालिंदर समीरला लग्नाच्या दिवशी पळून जाण्यास सांगतो, तर शत्रू गुरूजींचा अपघात घडवून आणतो आणि दुसऱ्या गुरूजींना मॅनेज करतो. समीर सुर्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच शत्रू त्याला थांबवतो.

नवी नवरी तेजश्री मंडपात आलेय, पण वराचा कुठे ही पत्ता नाही. इकडे गुरुजीही म्हणतात की आजचा दिवस तेजुच्या लग्नासाठी शुभ आहे, नाहीतर तिचं लग्न पुढे होणार नाही. सूर्याला याचा फार मोठा धक्का बसतो. अखेरीस जालिंदर एक आदेश देतो जो ऐकून सर्व थक्क होतात. त्यामुळे सूर्यादादा, जालिंदरच्या जाळ्यात फसेल? तेजूच लग्न शुभ मुहूर्तावर होईल का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.