अभिनेत्रीचा हट्ट अन् घडला इतिहास, 1947 चं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, पण ओळख मिळाली कॉमेडियन म्हणून

समुद्रात उडी मारण्याची धमकी देत मिळवली पहिली संधी; सुपरहिट गायिका ते हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला कॉमेडियन असा टुनटुन यांचा प्रेरणादायी प्रवास. कोण आहे ही अभिनेत्री?

अभिनेत्रीचा हट्ट अन् घडला इतिहास, 1947 चं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, पण ओळख मिळाली कॉमेडियन म्हणून
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 30, 2026 | 6:18 PM

Bollywood News : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांचे नशीब एका गाण्याने पालटले आहे. मात्र, एक अशीही अभिनेत्री-गायिका होऊन गेली, जिने संधी मिळाली नाही तर समुद्रात उडी मारून जीव देईन, अशी थेट धमकीच एका नामवंत संगीतकाराला दिली होती. ही कलाकार म्हणजे उमा देवी. पुढे संपूर्ण देश त्यांना ‘टुनटुन’ या नावाने ओळखू लागला. 1947 साली प्रदर्शित झालेल्या ‘दर्द’ या चित्रपटातील ‘अफसाना लिख रही हूं दिल-ए-बेकरार का’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले आणि उमा देवी एका रात्रीत स्टार पार्श्वगायिका बनल्या. पुढे गायन क्षेत्रातील संधी कमी झाल्यानंतर त्यांनी अभिनय आणि विनोदी भूमिकांमध्ये अशी छाप पाडली की, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला कॉमेडियन म्हणून त्यांचे नाव कायमचे इतिहासात नोंदले गेले.

उमा देवी अवघ्या 23 वर्षांच्या असताना आपले घर सोडून मुंबईत आल्या. अभिनय आणि गायनाची प्रचंड आवड असलेल्या उमा देवी थेट प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांच्या घरी पोहोचल्या. त्यांनी नौशाद यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, मला गाण्याची संधी द्या, अन्यथा मी समुद्रात उडी मारून जीव देईन.

त्यांच्या या निर्धाराने प्रभावित झालेल्या नौशाद यांनी त्यांची तात्काळ ऑडिशन घेतली. त्यांचा आवाज ऐकून ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी लगेचच उमा देवींना गाण्याची संधी दिली. 1946 मध्ये त्यांनी प्रथमच पार्श्वगायिका म्हणून गाणे गायले. मात्र, खरी ओळख 1947 मध्ये ‘दर्द’ चित्रपटातील ‘अफसाना लिख रही हूं दिल-ए-बेकरार का’ या गाण्यामुळे मिळाली. हे गाणे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय गीतांपैकी एक ठरले आणि उमा देवींचा आवाज देशभरातील रसिकांच्या मनात घर करून गेला.

गायिकेपासून कॉमेडी क्वीनपर्यंतचा यशस्वी प्रवास

1948 मध्ये ‘अनोखी अदा’ आणि ‘चंद्रलेखा’ यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांमुळेही उमा देवींची लोकप्रियता टिकून राहिली. मात्र, काळानुसार संगीत क्षेत्रात नवीन आवाजांचे आगमन झाले आणि त्यांच्या गायनाच्या संधी कमी होत गेल्या.

ही परिस्थिती पाहून संगीतकार नौशाद यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 1950 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाबुल’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांना दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. याच काळात दिलीप कुमार यांनी त्यांना ‘टुनटुन’ हे नाव दिले आणि त्यानंतर त्या याच नावाने संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाल्या.

Follow Us