
भयपटांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. कितीही कापरं भरवणारी दृश्ये असली, भीतीने पडद्यासमोर डोळेही उघडत नसले तरी थिएटरमध्ये जाऊन असे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. भारतीय चित्रपटांमध्ये इतका हॉरर का दाखवला जात नाही, अशीही तक्रार अनेकदा केली जाते. त्यामुळे असा प्रेक्षक आपोआपच हॉलिवूड किंवा इतर भाषांमधील भयपटांकडे वळतो. असंच काहीसं सध्या ‘द कॉन्जुरिंग: लास्ट राइट्स’ या चित्रपटाच्या बाबतीत घडतंय. 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि अवघ्या सात दिवसांत त्याने कमाईचे मोठमोठे विक्रम रचले आहेत.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 50.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवसाची कमाई 5 कोटी आणि 5.5 कोटी रुपये इतकी होती. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3.19 कोटी आणि सातव्या दिवशी जवळपास 3 कोटी रुपये कमावले. त्यामुळे आतापर्यंत भारतातील कमाईचा आकडा 67.19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परंतु हा आकडा अंतिम नाही. यात आणखी बदल होऊ शकतात.
या चित्रपटातही पॅट्रिक विल्सन आणि वेरा फार्मिगा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने 2025 या वर्षातील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप पाच हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.