
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी चित्रपटापेक्षा जास्त हिट होऊन ती चर्चेत येतात. यामध्ये काही चित्रपट असे देखील आहेत ज्यामधील गाणी फ्लॉप ठरली मात्र, चित्रपट सुपरहिट ठरले. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यात एकही गाणं नाही. ना इंटरव्हल. फक्त 20 दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते. जेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की तो ब्लॉकबस्टर झाला.
दरम्यान, आम्ही ज्या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगत आहोत. त्याचे नाव ‘इत्तेफाक’ आहे. हा चित्रपट 1969 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. ‘इत्तेफाक’ हा चित्रपट आपल्या काळाच्या खूप पुढचा होता. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामध्ये एकही गाणे नव्हते. एवढेच नाही तर हा चित्रपट इंटरव्हलशिवाय पूर्ण दाखवण्यात आला.
कमी बजेटमध्ये मोठे यश
‘इत्तेफाक’ या चित्रपटाचे बजेट देखील खूपच कमी होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कित्येक वर्षे चित्रपट बनवण्यासाठी लागतात पण हा चित्रपट केवळ 20 दिवसांमध्ये शूटिंगसह पूर्ण करण्यात आला. इतक्या कमी वेळात तयार झालेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाची कथा इतकी खास होती की प्रेक्षक शेवटच्या सीनपर्यंत खुर्चीला खिळून राहिले.
‘इत्तेफाक’ या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार पाहायला मिळाले. ज्यामध्ये राजेश खन्ना, नंदा, बिंदू, सुजीत कुमार आणि मदन पुरी यांनी या चित्रपटात प्रभावी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे गाणी नसतानाही कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात पूर्णपणे यशस्वी ठरला.
बॉलिवूडमधील एकमेव चित्रपट
याच कारणामुळे ‘इत्तेफाक’ला बॉलिवूडचा पहिला असा चित्रपट मानले जाते, ज्यात ना गाणी होती ना इंटरव्हल. या चित्रपटाने हे सिद्ध करून दाखवले की केवळ गाणी किंवा मोठा खर्च करून चित्रपट हिट होत नाहीत तर त्यासाठी भक्कम कथा आणि प्रभावी अभिनयही चित्रपटाला यश मिळवून देऊ शकतो.
आजही ‘इत्तेफाक’ हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वात वेगळ्या आणि लक्षात राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाने सिनेसृष्टीला हे शिकवले की, केवळ गाणी आणि मोठे बजेटच नाही तर मजबूत कथा आणि दमदार मांडणी देखील चित्रपटाला सुपरहिट बनवू शकते.