देश कंगाल होनेवाला है.., चिन्मय मांडलेकरच्या ‘गव्हर्नर’चा जबरदस्त टीझर; सर्वांत मोठ्या आर्थिक संकटाची कहाणी
चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'द सायलेंट सेवियर गव्हर्नर'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. देशातील सर्वांत मोठ्या आर्थिक संकटाची सत्य घटना यात पहायला मिळणार आहे. मनोज वाजपेयी यांनी यामध्ये गव्हर्नरची भूमिका साकारली आहे.

अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या ‘द सायलेंट सेवियर गव्हर्नर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये मनोज वायपेयी यांनी गव्हर्नरची भूमिका साकारली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा नव्वदच्या दशकातील आहे. ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द केरळ स्टोरी 2’ यांसारख्या चित्रपटांचे निर्माते विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मराठमोळा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. “देश कंगाल होनेवाला है” या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा डायलॉग ऐकू येतो, “मी ऐकलंय की तुम्ही खूप दूरदृष्टीचे आहात. गेल्या वर्षीच त्यांनी भाकीत केलं होतं की देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करत आहे.” यानंतर मनोज वाजपेयी यांची दमदार एण्ट्री होते.
तुम्ही समस्या सांगितली म्हणजे त्यावर उपायसुद्धा शोधून काढला असेचल, नाही का, असं मनोज वाजपेयींना विचारलं जातं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटतात. यानंतर अदा शर्माची एण्ट्री होते. ‘गव्हर्नर’ या चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी गव्हर्नर ए. रामनन यांची भूमिका साकारली आहे. त्यांना सांगितलं जातं की ते अयशस्वी झाले आहेत आणि त्यांची योजनाही अयशस्वी झाली आहे. त्यावर मनोज उत्तर देतात, “जर मी अयशस्वी झालो, तर आरबीआय अयशस्वी होईल आणि जर आरबीआय अयशस्वी झाली, तर भारत अयशस्वी होईल. मी भारताता अयशस्वी होऊ देणार नाही.”
2025 मध्ये चिन्मय मांडलेकर यांनी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या हिट कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्येही मनोज वायपेयी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘द सायलेंट सेवियर गव्हर्नर’ हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून यामध्ये 1990 च्या दशकातील भारतातील सर्वांत मोठ्या आर्थिक संकटाची कथा दाखवण्यात आली आहे. मनोज वाजपेयी यांनी या चित्रपटात आरबीआयच्या गव्हर्नरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा सुवेंदू भट्टाचार्जी, सौरभ भरत, रवी आसरानी आणि विपुल शाह यांनी लिहिली आहे. येत्या 12 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.