पद्मभूषण स्वीकारताना अल्का याज्ञिक यांना हात धरून का न्यावं लागलं? प्रकृतीबद्दल स्वत:च केला खुलासा
दोन वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असून कठीण काळातून जात असल्याचा खुलासा अल्का याज्ञिक यांनी केला आहे. नुकताच पद्मभूषण या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण पार पडलं. यावेळी विविध क्षेत्रातील 65 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांचाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयीही माहिती दिली आहे. मंगळवारी अलका याज्ञिक जेव्हा राष्ट्रपतींकडून पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचल्या, तेव्हा त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने मंचापर्यंत नेण्यात आल्याचं पहायला मिळालं. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. आता इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित अल्का यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सांगितलं आहे.
‘गेल्या दोन वर्षांपासून मी प्रसिद्धीच्या झोतातून, सार्वजनिक कार्यक्रमांमधून आणि माझ्या प्रवासातील गोष्टी इतरांपासून शेअर करण्यापासून दूर राहिले होते. मी माझ्या आरोग्याच्या कठीण काळातून जात होते, हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत होतं. या सर्व काळात तुमचं प्रेम, प्रार्थना, संदेश आणि खंबीर पाठिंबा मला प्रत्येक टप्प्यावर मिळत गेला. आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मभूषण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी बाहेर पडले, तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं भरलेलं होतं. हा सन्मान मला अत्यंत नम्रतेची जाणीव करून देणार आहे. जरी यावर माझं नाव असलं तरी हा सन्मान त्या प्रत्येक श्रोत्याचा आहे, ज्यांनी माझ्या आवाजाला आपल्या आयुष्यात स्थान दिलं, माझ्या गाण्यांना पिढ्यानपिढ्या जपलं आणि माझ्या यशाच्या तसंच आव्हानांच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले’, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
अल्का यांची पोस्ट-
View this post on Instagram
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘हा क्षण माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे, कारण हा केवळ माझ्या कामाचा गौरव नाही, तर प्रेम, आशा आणि जिद्द यांतून मिळणाऱ्या शक्तीची आठवण करून देणारा क्षण आहे. मी हळूहळू पुन्हा सावरत आहे आणि मला आज इथे उपस्थित राहायचं होतं. केवळ माझ्यासाठीच नाही, तर तुमच्या प्रत्येकासाठी, जे या प्रवासाचा एक भाग राहिले आहेत.’ या पोस्टच्या अखेरीस त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारत सरकार यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे त्यांनी चाहत्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
‘गेल्या अनेक वर्षांत तुम्ही दिलेलं प्रेम, आपुलकी, प्रार्थना आणि माझ्यावरील विश्वास यांबद्दल मी तुमची ऋणी आहे. या सर्व गोष्टी मी माझ्यासोबत जपून ठेवल्या आहेत. आज मी फक्त एक पुरस्कार स्वीकारला नाही, तर माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या लाखो लोकांचे प्रेम अनुभवले’, असं अल्का याज्ञिक यांनी लिहिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुमार सानू, शान, ईला अरुण यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
