6 दिवस हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये कोणीच आलं नाही, 7 व्या दिवशी इतकी गर्दी झाली की शो ठरले हाऊसफुल
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमीचा एक असा चित्रपट ज्याला प्रदर्शित झाल्यानंतर 6 दिवस कोणीच पाहण्यासाठी आले नाही. थिएटर होते रिकामे. पण 7 दिवशी अशी गर्दी झाली की शो झाले हाऊसफुल.

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही; मात्र नंतर याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मासूम’ या चित्रपटाची कथाही अशीच रंजक आहे. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुरुवातीला थिएटरमध्ये प्रेक्षक मिळत नव्हते. मात्र, काही दिवसांतच या चित्रपटाचे चित्र बदलले आणि हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील एक संस्मरणीय कलाकृती ठरला.
पहिल्या सहा दिवसांत थिएटर रिकामी, सातव्या दिवशी वाढली गर्दी!
‘मासूम’ हा दिग्दर्शक शेखर कपूर यांचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट होता. या चित्रपटाबद्दल ते खूप उत्सुक होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यांनी चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवली होती. मात्र, सुरुवातीचे सहा दिवस थिएटर पूर्णपणे रिकामे होते. पहिल्या दिवशी थिएटरमध्ये प्रेक्षक आले नाहीत आणि जवळपास सहा दिवस चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
यामुळे वितरकांनी चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्याबाबत विचारणा सुरू केली. मात्र, सातव्या दिवशी परिस्थिती बदलू लागली. प्रेक्षकांची गर्दी वाढली आणि दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होऊ लागले. अशा प्रकारे सुरुवातीला अपयशी ठरेल असे वाटणाऱ्या ‘मासूम’ने मोठे यश मिळवले.
शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाचे कौतुक
‘मासूम’ हा कौटुंबिक भावनांवर आधारित चित्रपट होता. शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. चित्रपटातील भावनिक कथा आणि संगीत यांमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाने शेखर कपूर यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली तर प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली.
पुढे शेखर कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘बँडिट क्वीन’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, ‘मासूम’ हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला. सुरुवातीचा थंड प्रतिसाद आणि त्यानंतर मिळालेले यश यामुळे हा चित्रपट आजही हिंदी सिनेसृष्टीतील लक्षवेधी चित्रपटांपैकी एक मानला जातो.
