‘लस्ट स्टोरीज’मधील कियाराच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीला होती पहिली पसंती; आईमुळे नाकारली ऑफर

कियाराने 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटातील कियाराच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधणं खूप आव्हानात्मक असल्याचं करणने त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सांगितलं होतं.

लस्ट स्टोरीजमधील कियाराच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती; आईमुळे नाकारली ऑफर
Kiara Advani
Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 22, 2024 | 1:29 PM

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘लस्ट स्टोरीज’ हा चार वेगवेगळ्या कथांचा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. महिलांच्या कामुक भावनेविषयी विविध कथा यात मांडण्यात आल्या होत्या. या चारही कथा चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या होत्या. त्यापैकी एक कथा करण जोहरने दिग्दर्शित केली होती. ज्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका होत्या. या कथेतील कियाराचा एक बोल्ड सीन प्रचंड चर्चेत आला होता. ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा कियारा पाहुणी म्हणून उपस्थित झाली, तेव्हा करणने तिच्या निवडीविषयीचा किस्सा सांगितला होता. कियाराच्या आधी त्याने अभिनेत्री क्रिती सनॉनला भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र क्रितीने करणला नकार दिला होता.

याविषयी करण म्हणाला, “लस्ट स्टोरीजमधील भूमिकेची ऑफर पहिल्यांदा क्रिती सनॉनला दिली होती. पण तिची आई तिला तशाप्रकारची भूमिका साकारण्याची परवानगी देत नव्हती. क्रितीच्या आईप्रमाणेच इतरही विचार करू शकतात असं मला वाटलं. कारण ती भूमिकाच आव्हानात्मक होती. नंतर कियारा मला फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी भेटली. तिला जेव्हा मी कथा ऐकवली तेव्हा ती संभ्रमात पडली. मात्र मी त्याचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटल्यावर तिने होकार दिला.”

फक्त करण जोहरसाठीच ‘लस्ट स्टोरीज’मध्ये काम केल्याचं कियाराने सांगितलं. “मला करणसोबत काम करायची खूप इच्छा होती. आता जेव्हा मी त्या भूमिकेचा विचार करते, तेव्हा मला ती बोल्ड अजिबात वाटत नाही. अशा विषयावर चित्रपट बनवणं खूप धाडसाचं होतं”, असं कियारा पुढे म्हणाली. अनुराग कश्यप, करण जोहर, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी या चार दिग्दर्शकांनी ‘लस्ट स्टोरीज’मधील चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. या चित्रपटाच्या इतर कथांमध्ये भूमी पेडणेकर, राधिका आपटे, मनिषा कोईराला यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2018 मध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.