तब्बल 17 वर्षांनंतर या मराठी अभिनेत्रीचा ‘तारक मेहता..’ला रामराम? चाहते नाराज

तब्बल 17 वर्षांनंतर या अभिनेत्रीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. या मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेत्रीला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

तब्बल 17 वर्षांनंतर या मराठी अभिनेत्रीचा तारक मेहता..ला रामराम? चाहते नाराज
'तारक मेहता..'ची टीम
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2025 | 2:32 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि जुनी मालिका आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका त्यातील कलाकारांच्या सोडून जाण्याने चर्चेत आली आहे. एकानंतर एक ‘तारक मेहता..’मधून कलाकार सोडून जात असल्याचे वृत्त समोर येत आहेत. नंतर काहींनी हे वृत्त फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं. आता मालिकेत मिसेस कोमल हाथीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रंजनकरने ‘तारक मेहता..’ला रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही एपिसोड्सपासून अंबिका या मालिकेत दिसत नसल्याने ही चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी, बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी ‘तारक मेहता..’ सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु नंतर या दोघांनी आणि मालिकेच्या निर्मात्यांनीही या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. दिलीप आणि मुनमुन यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी मालिकेतून सुट्टी घेतली होती. आता ‘मिसेस हाथी’ म्हणजेच अंबिका रंजनकरनेही तिच्या मालिका सोडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अंबिका रंजनकरने ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, “नाही, मी मालिका सोडली नाही. मी अजूनही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा भाग आहे. मी वैयक्तिक कारणामुळे या मालिकेतून गायब होती. मला स्वत:साठी काही वेळ हवा होता.” अंबिका गेल्या 17 वर्षांपासून या मालिकेत भूमिका साकारतेय. या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

आतापर्यंत ‘तारक मेहता..’ सोडलेल्या कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर कुश शाहने 2024 मध्ये या मालिकेला रामराम केला होता. त्याने यामध्ये गोली हंसराज हाथीची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी दिशा वकानी, गुरुचरण सिंग, नेहा मेहता, शैलेश लोढा, भव्य गांधी, राज अनाडकत, जेनिफर मिस्त्री बंसीवाल, झील मेहता, मोनिक भदौरिया आणि निधी भानुशाली यांनी मालिका सोडली होती. या मालिकेच्या निर्मात्यांवर काहींनी मानधन थकवल्याचा आणि काहींनी गैरवर्तणुकीचाही आरोप केला होता.