या सीरिजच्या बॉयकॉटची मागणी, तरी मिळाली 100% रेटिंग, OTT वर सर्वाधिक पाहिल्याचा विक्रम

जगभरातील के-ड्रामा चाहत्यांमध्ये एक नवीन वेब सीरिज चर्चेत आली आहे. आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सीरिजला रोटन टोमॅटोजवर 100 टक्के रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे, या सीरिजवर प्रदर्शनापूर्वी दक्षिण कोरियामध्ये बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती.

या सीरिजच्या बॉयकॉटची मागणी, तरी मिळाली 100% रेटिंग, OTT वर सर्वाधिक पाहिल्याचा विक्रम
के-ड्रामा
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2025 | 12:44 PM

ओटीटी विश्वात सध्या एका नव्या वेब सीरिजने धुमाकूळ घातला आहे. ही सीरिज 25 जुलै रोजी प्रदर्शित झाली असून अवघ्या काही दिवसांतच तिने विक्रम रचला आहे. जगभरात सर्वाधिक पाहिली गेलेली ही नॉन इंग्लिश वेब सीरिज ठरली आहे. ‘रोटन टोमॅटोज’वर या सीरिजला 100 टक्के आणि आयएमडीबीवर (IMDb) 7.1 रेटिंग मिळाली आहे. परंतु या वेब सीरिजचा प्रदर्शनापूर्वी दक्षिण कोरियामध्ये जबरदस्त विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. काही लोकांनी तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या सीरिजचं नाव आहे ‘ट्रिगर’. कोरियनमध्ये या सीरिजचं नाव ‘द अदर साइड ऑफ द गन’ असं आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजची कथा दक्षिण कोरियातील काल्पनिक कथा आहे. जिथे जनतेनं देशातील बंदूकविरोधातील कडक कायद्याकडे साफ दुर्लक्ष केलंय. किम नाम गिल, किम यंग क्वांग, पार्क हून यांच्या भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन क्वॉन ओह-सुंग यांनी केलं आहे.

ही काल्पनिक कथा दक्षिण कोरियामध्ये घडते, जिथे बंदुकीच्या वापरावर कडक बंदी आहे. तरीही बेकायदेशीर बंदुकांचा बाजार भरभराटीला येत आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित गुन्हे सतत घडत आहेत. या कथेच्या केंद्रस्थानी दोन लोक आहेत, त्यापैकी एक पोलीस अधिकारी आणि दुसरा एक धूर्त शस्त्र विक्रेता आहे. अर्थात दोघांच्याही हातात बंदुका आहेत, पण दोघांची कारणं वेगवेगळी आहेत. त्यातच असाध्य आजारामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेला एक माणूस देशात बेकायदेशीर शस्त्रे भरण्याचा निर्णय घेतो. त्याला सर्वकाही उद्ध्वस्त करायचं आहे.

निषेध आणि वादाच्या पार्श्वभूमीवर ही वेब सीरिज हळूहळू समीक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘रोटन टोमॅटोज’वर 100 टक्के रेटिंग मिळवणारी ही एक दुर्मिळ के-ड्रामा ठरली आहे. या सीरिजच्या प्रदर्शनापूर्वी दक्षिण कोरियामध्ये त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. ही सीरिज इंचॉनमधील सोंगदो इथं झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर आधारित असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. परंतु त्या घटनेशी सीरिजचा कोणताही संबंध नसल्याचं नंतर दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. तरीही बंदुका आणि हिंसाचार दाखवणारी ही सीरिज कोरियन लोकांची खरी ओळख नाही, असं म्हणत अनेकांनी विरोध केला. तरीही ही सीरिज नेटफ्लिक्सच्या जागतिक यादीत सर्वाधिक पाहिली जाणारी नॉन इंग्लिश सीरिज ठरली आहे.

‘ट्रिगर’ने ‘लेटर फ्रॉम द पास्ट’ आणि ‘अँजेला’ यांसारख्या वेब सीरिजना मागे टाकलं आहे. हा के-ड्रामा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जागतिक चार्टमध्ये इतर अनेक भाषांमधील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या आठवड्यात ही सीरिज 29 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. रोमानिया, हाँगकाँग, इंडोनेशिया, कुवेत, थायलंड आणि दक्षिण कोरियासारख्या 20 देशांमध्ये ही सीरिज टॉप 10 मध्ये आहे.