6 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने गुपचूप केली प्रचंड कमाई, कमावला 126 टक्के अधिक नफा
6 कोटी रुपये बजेट असणार्या या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गुपचूप केली प्रचंड कमाई. चित्रपटाच्या बजेटपेक्षा 126 टक्के अधिक नफा कमावला. अजूनही चित्रपट थिएटरमध्ये सुरु.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल असे चित्र सध्या दिसत आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत इतिहास रचला असतानाच आता आणखी एका मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. साई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी आणि इतर दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या ‘तुंबाडची मंजुला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले आहे.
नवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही ‘तुंबाडची मंजुला’ची घोडदौड कायम आहे. प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17व्या दिवशी, म्हणजेच तिसऱ्या रविवारी, तब्बल 1.02 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे 16व्या दिवशी चित्रपटाने 75 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे एका दिवसात तब्बल 36 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
आतापर्यंत ‘तुंबाडची मंजुला’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 13.57 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून ही रक्कम ग्रॉस कमाईच्या स्वरूपात सुमारे 16.01 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चित्रपटाची सध्याची कमाई पाहता तो लवकरच 20 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इतकेच नाही तर चित्रपटगृहांमधील प्रदर्शन संपण्यापूर्वी 25 कोटी रुपयांचा टप्पाही गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
6 कोटींच्या बजेटवर 126 टक्क्यांहून अधिक परतावा
‘तुंबाडची मंजुला’चे बजेट सुमारे 6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या तुलनेत चित्रपटाने केवळ 17 दिवसांत 13.57 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाला 7.57 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला असून गुंतवणुकीवर तब्बल 126.16 टक्के परतावा (ROI) मिळाला आहे.
या दमदार कामगिरीमुळे चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर अधिकृतपणे ‘हिट’चा दर्जा मिळाला आहे. आता ‘सुपरहिट’ ठरण्यासाठी चित्रपटाला 150 टक्के परतावा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांची नेट कमाई गाठावी लागणार आहे. म्हणजेच चित्रपटाला आणखी फक्त 1.43 कोटी रुपयांची कमाई करायची आहे. सध्याचा वेग पाहता हा टप्पा येत्या काही दिवसांत सहज पार होण्याची शक्यता आहे.