
Disha Patani House Firing Encounter : गेल्या काही दिवसांपासून दिशा पाटणी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तिच्या बरेली येथील घरावर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे उत्तर प्रदेश तसेच बॉलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन आरोपींचे नाव समोर आले होते. दरम्यान, आता याच घटनेतील या दोघांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी चकमकीत ठार केल्याचे समोर आले आहे. या दोघांचेही एन्काऊंटर झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने दिशा पाटणीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचे एन्काऊंटर केले आहे. एन्काऊंटर करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव रविंद्र उर्फ कल्लू आणि दुसऱ्या आरोपीचे नाव अरुण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या एसटीएफ पथकात आणि या आरोपींमध्ये गाझियाबाद येथे चकमक झाली. याच चकमकीत ते दोघेही मारले गेले आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार दोन्ही आरोप रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगचे सक्रीय सद्सय होते. बरेली जिल्ह्यात दिशा पाटणी हिचे घर आहे. याच घरावर 12 सप्टेंबरच्या रात्री गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बरेलीचे पोलीस तसेच उत्तर प्रदेशची एसटीएफ या प्रकरणाच्या तपासाला लागले होते. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. पोलिसांकडून अनेक सीसीटीव्ही तपासण्यात आले. सीसीटीव्ही तसेच क्राइम रेकॉर्ड्स तपासून पोलिसांनी या दोन आरोपींची ओळख पटवली होती. हो दोन्ही आरोपी हरियाणाचे रहिवासी होते. आता पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज युपी एसटीएफला या आरोपींचा माग लागला होता. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एसटीएफच्या नोएडा युनिटने तसेच दिल्लीच्या सीआय युनिटने संयुक्तपणे कारवाई केली. त्यांच्या एका टीमने गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटी येथे आरोपींना गाठले. तिथे आरोपी आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. यात रविंद्र आणि अरूण जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.