
Sanjay Dutt – Mumbai Blast: अभिनेता संजय दत्त आता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असला तरी एकेकाळी गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला होता. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फॉट प्रकरणात संजय दत्त याचं देखील नाव समोर आलं होत. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. संजय दत्तवर बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप होता, जी या स्फोटांमध्ये वापरली गेली होती.
12 मार्च 1993 मध्ये मुंबईत एका मागोमाग 12 हल्ले झाले. या हल्ल्यात तब्बल 257 लोकांना स्वतःचे प्राण गमावले तर, 700 पेक्षा जास्त लोकं जखमी होते. या हल्ल्यामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि टाइगर मेमन (Tiger Memon) यांचा देखील सहभाग होता. या स्फोटांच्या तपासादरम्यान, पोलिसांना असं आढळून आलं की, हल्ल्यांसाठी शस्त्रे आणि स्फोटके वापरली गेली होती, जी बेकायदेशीरपणे मुंबईत आणण्यात आली होती.
हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक महत्त्वाचा सुगावा समोर आला. त्यानंतर निर्माते समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला यांची नावे देखील समोर आली, जे अंडरवर्ल्डशी संबंधित होते. पोलिसांना संशय होता की या लोकांनी संजय दत्तशी संपर्क साधला होता. चौकशीदरम्यान, हनीफ कडावालाने कबूल केलं की त्याने संजयला बेकायदेशीर शस्त्रे पुरवली होती.
संजय दत्तवर याच्या घरी एके-56 रायफल, एक पिस्तूल, काही हातबॉम्ब आणि काडतुसे ठेवल्याचा आरोप होता. ही शस्त्रे दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम याच्यामार्फत पोहोचवण्यात आली होती. 19 एप्रिल 1993 रोजी संजय दत्त मॉरिशसहून परतला, जिथे तो ‘आतिश’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी होता. मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर टाडा (Terrorist and Disruptive Activities Act) अंतर्गत आरोप करण्यात आले.
अटक झाल्यानंतर संजय दत्तने मान्य केलं होतं की, त्याने हत्यार स्वतःकडे ठेवले होते. पण अभिनेत्याने असं देखील सांगितलं होतं की, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हत्यार घरात ठेवले होते. जवळ असलेल्या हत्यांरांचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये करण्यात आलेला नाही. संजयने असेही कबूल केले की त्याचे हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा यांच्या माध्यमातून अंडरवर्ल्डशी संपर्क होते.
अटकेनंतर संजय दत्तला येरवडा तुरुंगात पाठवण्यात आलं. त्याच्याविरुद्ध 10 हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ज्यामध्ये 189 लोकांना आरोपी सांगण्यात आलं. संजय दत्तविरुद्ध बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला.
2006 मध्ये न्यायालयाने संजय दत्तला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरवलं. पण दहशतवादी कट रचण्याच्या आरोपातून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं. 2006 रोजी न्यायालयाने त्याला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. संजय दत्तने अनेक वेळा दया याचिका दाखल केल्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली. फेब्रुवारी 2013 मध्ये, तो पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगू लागला. आता संजूबाबा कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असून सिनेमांमध्ये देखील पुन्हा सक्रिय झाला आहे.