79 वर्षीय उषा नाडकर्णी राहतात एकट्याच; अंकितासमोर बोलून दाखवली ‘ही’ भीती

अभिनयक्षेत्रात 16 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेनं तिच्या घरी एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीसुद्धा उपस्थित होत्या. त्याचा व्हिडीओ अंकिताने तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.

79 वर्षीय उषा नाडकर्णी राहतात एकट्याच; अंकितासमोर बोलून दाखवली ही भीती
Usha Nadkarni and Ankita Lokhande
Image Credit source: Youtube
| Updated on: Jun 03, 2025 | 10:27 AM

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं कलाविश्वात 16 वर्षे पूर्ण केली आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने अर्चनाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतची जोडी घराघरात पोहोचली होती. अर्चना-मानव ही आजसुद्धा अनेकांची सर्वांत आवडती जोडी आहे. कलाविश्वात 16 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अंकिताने तिच्या मुंबईतल्या घरी गेट-टुगेदरचं आयोजन केलं होतं. यावेळी मालिकेत अंकिताच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीसुद्धा पार्टीला उपस्थित होत्या. या रियुनियनचा व्हिडीओ नंतर अंकिताने तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला. यावेळी अंकिता आणि उषा यांनी मालिकेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.

मालिकेच्या आठवणींना उजाळा देताना अंकिता आणि उषा नाडकर्णी भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्याही आठवणी सांगितल्या. सुशांतबद्दल बोलताना उषा यांना भरून आलं होतं. याच व्हिडीओमध्ये नंतर उषा त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या.

79 वर्षीय उषा सध्या मुंबईत एकट्यात राहत आहेत. त्यामुळे कधी-कधी भीती वाटते आणि एकटेपणा जाणवतो, असं त्यांनी सांगितलं. “मी घरात एकटीच राहते. त्यामुळे मला भीती वाटते की कधी कुठे पडले आणि कोणालाच त्याची कानोकान खबर लागली नाही तर? गेल्या वर्षी 30 जून रोजी माझ्या भावाचं निधन झालं. जर त्याला समजलं असतं की मी कोणत्या त्रासातून जातेय, तर तो लगेच धावत माझ्याकडे आला असता. आता मी कोणासोबत या गोष्टी शेअर करू”, असा भावूक सवाल त्यांनी केला. उषा यांचं हे बोलणं ऐकताना अंकिता आणि तिचा पती विकी जैनसुद्धा भावूक झाले होते.

अंकिताने उषा यांचा धीर वाढवण्याचाही प्रयत्न केला. “आई खूप स्ट्राँग आहे. ती एकटीच राहतेय आणि इतक्या वर्षांपासून ती एकटीच आहे. मी अनेक वर्षांपासून आईला पाहतेय”, असं ती म्हणाली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतरही अंकिताने त्यातील कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याचं या व्हिडीओत पहायला मिळालं. यावेळी अंकिताने सुशांतच्याही आठवणींना उजाळा दिला. “सुशांत इतका चांगला अभिनेता होता. तो माझी खूप मदत करायचा. कारण तेव्हा मी नवीनच होती आणि इतर कलाकारांसमोर जाताना मला खूप भीती वाटायची. तेव्हा तो मला शिकवायचा”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.