
Vadh 2 Box Office Collection Day 3: सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ आणि राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या, जोरदार प्रमोशन झालेल्या चित्रपटांमध्ये एखादा लहान आणि चांगला कंटेंट असणारा चित्रपट टिकून राहणं ही आजच्या बॉक्स ऑफिसच्या काळात मोठी गोष्ट मानली जाते. ना प्रचंड जाहिरातबाजी, ना तरुण ग्लॅमरस स्टार्स तरीही जर एखादा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत असेल तर त्यामागे भक्कम कथा आणि दमदार अभिनय असल्याचं मान्य करावंच लागतं. असाच एक सुखद धक्का देणारा चित्रपट म्हणजे ‘वध 2’.
आजूबाजूला ‘बॉर्डर 2’ आणि ‘मर्दानी 3’ सारख्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा असताना ‘वध 2’ सारख्या छोट्या चित्रपटाने स्वतःची जागा निर्माण करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कुठलाही आक्रमक प्रमोशनचा धडाका लावण्यात आलेला नव्हता. तरीही, केवळ वर्ड ऑफ माउथच्या जोरावर हा चित्रपट हळूहळू प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे.
ओपनिंग संथ पण कमाईत वेग
‘वध 2’ने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर सुरुवात थोडी संथ केली आणि पहिल्या दिवशी केवळ 0.5 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र त्यानंतर चित्रपटाने चांगलीच पकड घेतली. शनिवार कमाई दुप्पट होत 1 कोटी रुपये झाली. रविवार पुन्हा 1 कोटी रुपये. अशा प्रकारे अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने 2.5 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यावरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असल्याचं स्पष्ट दिसून येतं आहे.
‘वध 2’ची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याची कथा आणि कलाकारांची निवड. संजय मिश्रा यांनी एका थकलेल्या, वयोवृद्ध जेल गार्डची भूमिका साकारली आहे. नीना गुप्ता या एका अशा महिला कैद्याच्या भूमिकेत दिसतात, जिच्या शिक्षेचे शेवटचे दिवस सुरू आहेत. या दोघांमधील भावनिक नातं, शांत केमिस्ट्री आणि सूक्ष्म अभिनय प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
जसपाल सिंह संधू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट जेलच्या आत घडणाऱ्या एका धक्कादायक गुन्ह्याच्या थरारक कथा उलगडतो. याशिवाय, कुमुद मिश्रा यांनी साकारलेला कडक, शिस्तप्रिय जेल सुपरिटेंडेंटचा रोल कथेला अधिक तीव्र आणि गंभीर बनवतो. मोठ्या स्टार्सच्या झगमगाटाशिवायही, फक्त दमदार कंटेंटच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर उभा राहणारा हा चित्रपट सध्याच्या काळात एक दुर्मिळ उदाहरण ठरत आहे.