
मल्याळम सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते श्रीनिवासन यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या कित्येक वर्षांपासून वयोमानानुसार येणाऱ्या समस्या आणि हृदयरोगाने त्रस्त होते. ते केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यातील उदयमपेरूर येथील आपल्या घरी उपचार घेत होते. पण 20 डिसेंबर रोजी त्यांचे अचानक निधन झाले.
नेमकं काय झालं?
शनिवारी सकाळी डायलिसिससाठी जाताना श्रीनिवास यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना कोच्चीतील त्रिपुनिथुरा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
श्रीनिवासन यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी केरळातील थालास्सेरीजवळील पट्टयम येथे झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि आई गृहिणी होत्या. त्यांनी कडिरूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मट्टानूर येथील पीआरएनएसएस कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. नंतर त्यांनी चेन्नईतील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून सिनेमा विषयाचे शिक्षण घेतले.
१९७७ मध्ये केली अभिनय कारकीर्दीची सुरुवात
श्रीनिवासन यांनी १९७७ मध्ये पी.ए. बैकर यांच्या ‘मणिमुझक्कम’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. जवळपास पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी २२५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. सामाजिक व्यंग्य आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित भूमिकांसाठी त्यांना विशेष ओळख मिळाली. ‘नाडोडिक्कट्टू’ आणि ‘पट्टनप्रवेशम’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सामान्य माणसाच्या संघर्षाचे चित्रण केले.
अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी दिग्दर्शनही केले आणि काही चित्रपटांची निर्मितीही केली. श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चिंताविश्टयया श्यामला’ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९९८) मिळाला होता. तसेच ते सुपरहिट चित्रपट ‘थट्टथिन मरयथु’चे सह-निर्माते होते, ज्याचे दिग्दर्शन त्यांच्या मुलाने विनीत श्रीनिवासन याने केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी विमला आणि दोन मुले आहेत. मुले विनीत श्रीनिवासन आणि ध्यान श्रीनिवासन हेही मल्याळम सिनेमातील नावाजलेले कलाकार आहेत. विनीत यांनी ‘मलारवाडी आर्ट्स क्लब’, ‘थट्टथिन मरयथु’ आणि ‘हृदयम’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.