हमारी सबसे बड़ी कमाई.. चिमुकल्याची गर्जना ऐकून विकी कौशल भारावला

अभिनेता विकी कौशलने या लहान मुलाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आमची सर्वांत मोठी कमाई.. असं कॅप्शन देत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला थिएटरमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हमारी सबसे बड़ी कमाई.. चिमुकल्याची गर्जना ऐकून विकी कौशल भारावला
विकी कौशल
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2025 | 3:56 PM

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल आहेत. हा चित्रपट पाहिलेला प्रत्येक प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडताना दिसत आहे. देशभरात ‘छावा’ला मिळणारा प्रतिसाद पाहून खुद्द विकी कौशलसुद्धा भारावला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका छोट्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला गर्जना करताना दिसतोय. ही गर्जना करतानाही त्याच्या डोळ्यात पाणी आहे. विकीने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येईल.

या व्हिडीओत पाच ते सहा वर्षांचा एक चिमुकला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये संपल्यानंतर रडत छातीवर हात ठेवून गर्जना करतोय. या चिमुकल्याने थिएटरमध्ये गारद म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मुलाचा व्हिडीओ शेअर करत विकीने लिहिलं, ‘आमची सर्वांत मोठी कमाई. बेटा.. तुझा खूप अभिमान. तुला एक मिठी द्यावीशी वाटतेय. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि भावनांबद्दल खूप खूप आभार. जगातल्या प्रत्येक घरात शंभूराजेंची कथा पोहोचावी अशी आमची इच्छा आहे आणि ते घडताना पाहणं हाच आमचा मोठा विजय आहे.’ या व्हिडीओवर अभिनेता आयुषमान खुरानानेही कमेंट केली आहे. त्याने हात जोडतानाचा आणि डोळ्यात पाणी आल्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 116.5 कोटी रुपये कमावले आहेत. ‘छावा’ने देशभरात पहिल्या वीकेंडलाच कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 100 कोटींचा टप्पा पार करणारा ‘छावा’ हा विकी कौशलच्या करिअरमधील सहावा आणि रश्मिका मंदानाच्या करिअरमधील आठवा चित्रपट ठरला आहे.