‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन

पती विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळतंय. अशातच त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही सासूसोबत महाकुंभला पोहोचली आहे. प्रयागराजमध्ये कतरिनाने साधूसंतांचं दर्शन घेतलं.

छावाच्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
महाकुंभला पोहोचली कतरिना कैफ
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2025 | 2:03 PM

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. सर्वत्र याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकीच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी विकी प्रयागराजमधील महाकुंभला गेला होता. तिथे त्याने संगमवर पवित्र स्नान केलं. त्यानंतर आता ‘छावा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत असताना त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ प्रयागराजला गेली आहे. यावेळी कतरिना एकटीच नव्हती, तर तिच्यासोबत तिची सासूसुद्धा होती. महाकुंभमधील कतरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी कतरिनाने साधा पंजाबी सूट परिधान केला होता, तर विकीच्या आईनेसुद्धा पंजाबी सूट घातला होता. संगममध्ये पवित्र स्नान करण्यापूर्वी कतरिना आणि तिच्या सासूने तिथल्या साधूसंतांचं दर्शन घेतलं. कतरिनावर पुष्पवृष्टी करून आणि तिच्या गळ्यात माळ घालून तिचं स्वागत करण्यात आलं. महाकुंभमधील साधूंनीही कतरिनाशी संवाद साधला. कतरिना विकीच्या कुटुंबीयांसोबत अनेकदा धार्मिक स्थळांना भेट देत असते. काही दिवसांपूर्वीच ती आणि तिची सासू शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या.

‘छावा’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला विकी पत्नी आणि आईवडिलांसोबत पोहोचला होता. चित्रपट पाहिल्यानंतर विकीच्या आईवडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. कतरिनानेही विकीच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. ‘छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या चित्रपटात अत्यंत भव्यदिव्यतेने दाखवण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर हे अत्यंत उत्तम प्रकारे कथा पडद्यावर सांगतात. हा चित्रपट पाहून मी थक्क झाले. शेवटची चाळीस मिनिटं तुम्हाला नि:शब्द करतील. या चित्रपटाने माझ्यावर जो प्रभाव टाकला आहे, ते मी शब्दांत मांडू शकत नाही. विकी कौशल.. तू खरंच उत्कृष्ट अभिनेता आहेस. स्क्रीनवरील तुझा प्रत्येक सीन अत्यंत सहज आणि तितकाच ताकदीचा वाटतो. तुझ्या या प्रतिभेचा मला खूप अभिमान आहे,’ अशी पोस्ट तिने लिहिली होती.

‘छावा’ या चित्रपटाने कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. यामध्ये विकीसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.