विजय देवरकोंडाने पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा केला लिलाव; म्हणाला “दगडाच्या तुकड्यापेक्षा..”
'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी अभिनेता विजय देवरकोंडाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र फिल्मफेअरची ही ट्रॉफी त्याने लिलावात विकून टाकली. यामागचं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

साऊथ स्टार विजय देवरकोंडाला संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अर्जुन रेड्डी’ (2017) या चित्रपटाने रातोरात लोकप्रिय बनवलं. या बहुचर्चित चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. याच चित्रपटामुळे विजयला त्याच्या करिअरमधील पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘अर्जुन रेड्डी’मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र 2018 मध्ये लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला, जेव्हा त्यांना समजलं की विजयने त्याच्या या पहिल्यावहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव केला होता. या ट्रॉफीच्या लिलावातून त्याला 25 लाख रुपये मिळाले होते. हीच रक्कम त्याने मुख्यमंत्री सहायता निधीत दान केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने या लिलावामागचं कारण सांगितलं आहे.
या मुलाखतीत विजयने सांगितलं की तो अशी व्यक्ती नाही आहे जी फोटोग्राफ किंवा पुरस्कारांचा संचय करेल. मात्र गेल्या काही काळात आपल्या आईवडिलांचे जुने फोटो पाहिल्यानंतर आपल्या मुलांच्याही आठवणी अशाप्रकारे साठवून ठेवाव्यात, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. विजय म्हणाला, “मी गेल्या 6 महिन्यांपासून असा झालोय. आतापर्यंत मी माझ्या फोनमधूनही दरवर्षी सर्व फोटो काढून टाकायचो. कारण मला फक्त वर्तमानकाळात जगायला आवडतं.”
View this post on Instagram
जेव्हा विजयला विचारलं गेलं की तो त्याला मिळालेल्या प्रमाणपत्र आणि ट्रॉफीसाठी त्याने खास जागा बनवली आहे का? त्यावर तो सांगतो, “काही माझ्या ऑफिसमध्ये असतील. तर काही घरात आईने जपून ठेवले असतील. मला लक्षातही नाही की त्यापैकी माझे कोणते आणि माझ्या भावाचे कोणते आहेत? काही पुरस्कार तर मी वाटून टाकतो. एक पुरस्कार मी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला दिलंय. मी माझ्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार लिलावात विकला होता. त्यातून मला चांगली रक्कम मिळाली आणि ती मी दान केली. ही गोष्ट माझ्यासाठी घरात ठेवलेल्या एका दगडाच्या तुकड्यापेक्षा जास्त चांगली आठवण आहे.”
विजयचा ‘फॅमिली स्टार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित या चित्रपटात तो मृणाल ठाकूरसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. येत्या 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
