राजकारणातील असली ‘धुरंधर’, दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला अन् बनला मुख्यमंत्री, संपत्ती पाहूनच बसेल धक्का
17 वर्षांपूर्वी राजकारणात आवडणारा अभिनेता, राहुल गांधीच्या भेटीनंतर रंगलेल्या चर्चा. आता दोन वर्षात पक्ष स्थापन करून बनला मुख्यमंत्री. दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट.

Thalapathy Vijay : 2009 मध्ये झालेल्या एका भेटीपासून सुरू झालेला राजकारणातील चर्चेचा प्रवास अखेर 2026 मध्ये वास्तवात उतरला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपती यांनी अखेर तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवत द्रविड पक्षांच्या दशकांपासूनच्या वर्चस्वाला मोठे आव्हान दिले.
ऑगस्ट 2009 मध्ये विजय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती. त्या भेटीनंतर विजय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. त्यावेळी पुडुचेरी येथे झालेल्या ‘विजय मक्कल इयक्कम’च्या बैठकीत त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
राहुल गांधी आणि विजय यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली होती. त्यानंतर विजय यांना तमिळनाडू युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी देण्याची ऑफर मिळाल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र विजय यांनी त्या सर्व अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले होते की, त्यांची भेट ही केवळ शिष्टाचार म्हणून झाली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना विजय म्हणाले होते, ‘सध्या माझं पूर्ण लक्ष चित्रपटांवर आहे. राजकारणात येण्याचा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही. अभिनय हाच माझा पहिला प्राधान्यक्रम आहे.’
चित्रपटांमधून दिसला राजकीय संदेश
राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर काही काळ राजकारणाच्या चर्चा शांत झाल्या असल्या तरी पुढील अनेक वर्षे विजय यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक आणि राजकीय आशय स्पष्टपणे दिसू लागला. ‘थलैवा’, ‘मर्सल’, ‘सरकार’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भ्रष्टाचार, सत्ताव्यवस्था आणि सामान्य जनतेच्या समस्यांवर थेट भाष्य केले. त्यांच्या भूमिकांमधून जनतेसाठी लढणाऱ्या नेत्याची प्रतिमा तयार होत गेली. मात्र त्यांनी दीर्घकाळ थेट राजकारणात प्रवेश करण्याबाबत मौनच राखले.
2024 मध्ये पक्ष स्थापन करून अधिकृत राजकीय एंट्री
2 फेब्रुवारी 2024 रोजी विजय यांनी TVK या पक्षाची घोषणा करत राजकारणात अधिकृत प्रवेश केला. पक्ष स्थापनेवेळी त्यांनी हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर जाऊन पूर्णवेळ राजकारणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या शेवटच्या चित्रपटाबाबत ‘जन नायकन’ हे नाव चर्चेत आले होते. या चित्रपटात जनतेसाठी लढणाऱ्या नेत्याची कथा दाखवली जाणार असल्याची चर्चा होती. चित्रपटाच्या राजकीय आशयामुळे त्याकडे विशेष लक्ष लागले होते. आज थलपती विजय हा कोट्यवधींचा मालक आहे.