अहमदाबाद विमान अपघातात विक्रांत मेस्सीने गमावली जवळची व्यक्ती, म्हणाला…
अभिनेता विक्रांत मेस्सीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दु:ख व्यक्त केलं आहे.

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडिया विमानातून 242 लोक प्रवास करत होते. त्यापैकी एक बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा जवळचा मित्र क्लाइव्ह कुंदर देखील होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. विक्रांतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याने लिहिले की या बातमीने मोठा धक्का बसला आहे.
विक्रांत मेस्सीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादमधील विमान अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांसाठी माझे हृदय तुटत आहे. माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी आपला मुलगा क्लाइव्ह कुंदर याला गमावल्याचे जाणून मला अधिक दु:ख झाले. क्लाइव्ह त्या फ्लाइटमध्ये फर्स्ट ऑपरेटिंग ऑफिसर होता.”
242 लोक विमानात होते
विक्रांतने आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिले, “देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि सर्व प्रभावित लोकांना शक्ती देवो.” विमानात 242 प्रवासी होते, त्यापैकी 230 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स होते. गुरुवारी दुपारी 1:39 वाजता फ्लाइटने उड्डाण केले आणि काही मिनिटांतच ती कोसळली. अपघातानंतर विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.
‘कन्नप्पा’च्या निर्मात्यांनी रद्द केला कार्यक्रम
सलमान, शाहरुखपासून आमिर खानपर्यंत अनेक मोठ्या चित्रपट स्टार्सनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. सलमानने आपला इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग नावाचा कार्यक्रम, जो गुरुवारी होणार होता तो रद्द केला. या दु:खद प्रसंगी ‘कन्नप्पा’च्या निर्मात्यांनीही मोठे पाऊल उचलले आहे. 13 जून रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम होणार होता, पण अपघातानंतर दिग्दर्शक मुकेश कुमार सिंह यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘कन्नप्पा’मध्ये अभिनेता विष्णु मांचू मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमार देखील या चित्रपटाचा हिस्सा आहे आणि तो यात भगवान शंकराची भूमिका साकारत आहे.