
मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कलाकारांमध्ये दिवंगत अभिनेते गोवर्धन असरानी यांचं नाव सर्वांत आधी घेतलं जाईल. ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर है’ यांसारखे त्यांचे डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. आयुष्य भरभरून जगणाऱ्या अशा या कलाकाराने 20 ऑक्टोबर 2025 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना विविध कलाकार उजाळा देत आहेत. त्यापैकी एक किस्सा रेखा आणि जया बच्चन यांच्याशी संबंधित आहे. फार क्वचित लोकांना माहीत असेल की असरानी यांनी एकेकाळी या दोघींना घर शोधण्यात मदत केली होती. त्यानंतर दोघी एकाच इमारतीत राहू लागल्या होत्या.
असरानी यांचे मित्र आणि लेखक-पत्रकार हनिफ झवेरी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “असरानी नेहमीच लोकांची मदत करायचे. जेव्हा ते फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी ठरले, तेव्हा त्यांनी रेखा यांना घर शोधण्यात मदत केली होती. रेखा त्यावेळी स्वत:साठी घर शोधत होत्या. कारण त्या तेव्हाच चेन्नईहून मुंबईला आल्या होत्या आणि त्यांना इथलं फारसं काही माहीत नव्हतं. तेव्हा त्यांनी असरानींशी संपर्क साधला होता. असरानी यांनी त्यांची भेट एका ब्रोकरशी करून दिली आणि त्यांना भाडेतत्त्वावर घर मिळवून दिलं होतं. त्यानंतर जया बच्चन भोपाळहून मुंबईला आल्या होत्या. त्यांनासुद्धा मुंबईत राहण्यासाठी घर हवं होतं. अशातच असरानी यांनीच जया बच्चन यांचीसुद्धा मदत केली होती. योगायोगाने त्या दोघींचंही घर एकाच इमारतीत होतं.”
जया बच्चन यांनी ‘गुड्डी’ या चित्रपटात असरानींसोबत काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. याच चित्रपटाने असरानी यांना स्टार बनवलं होतं. असरानी यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘आज की ताजा खबर’, ‘रोटी’, ‘चुपके चुपके’, ‘छोटी सी बात’, ‘रफू चक्कर’, ‘शोले’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची चार्ली चॅप्लिनच्या पेहरावातील जेलरची भूमिका आणि डायलॉग्स लोकप्रिय ठरले.