
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानचे लाखो चाहते आहेत. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत, परंतु त्याच्या करिअरमध्ये एक असा काळ आला जेव्हा त्याचे 8 चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप झाले होते. सलमान खानला काम मिळणे बंद झाले होते आणि त्याला निर्मात्यांकडून चांगल्या स्क्रिप्टची अपेक्षा होती. त्यानंतर सलमान खानचे स्टारडम धोक्यात आले होते, कारण त्याचे बरेच चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामुळे एक हिट चित्रपट मिळवण्यासाठी तो आतूर झाला होता. तेव्हा त्याने अर्ध्या रात्री एका सुपरस्टारकडे फोन करून मदत मागितली होती.
सलमान खानचं तळाला गेलेलं करिअर ज्या अभिनेत्याने सावरलं तो त्याचा चांगला मित्रही आहे. पण त्याच सुपरस्टारला मिळालेला एक चित्रपट सलमानने त्याच्यासाठी सोडायला सांगितला होता, हे तुम्हाला माहीत आहे का . ऐकायला जरी विचित्र वाटल तरी हे खरं आहे. याचा खुलासा त्याच अभिनेत्याने केला होता. ज्या सुपरस्टारने सलमान खानच्या एका फोनवर चित्रपट सोडला होता, त्याने एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य केले होते. एकामागून एक सुपरहिट चित्रपटां त्याने दिले होते. पण जेव्हा त्याचा मित्र अडचणीत सापडला, तेव्हा त्याने त्याची साथ देत करिअरमध्ये मदत केली. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नव्हे तर होता गोविंदा. त्यानेच ही गोष्ट शेअर केली होती.
सलमानमुळे गोविंदाला ‘पार्टनर’मध्ये मिळाली होती एंट्री
सलमानने आपल्याला ‘पार्टनर’ चित्रपटात एन्ट्री कशी मिळवून दिली आणि बुडणारं करिअर कसं वाचवलं, हे गोविंदाने अनेकदा सांगितले आहे. जेव्हा गोविंदाने चित्रपटांमध्ये एंट्री केली, तेव्हा त्याच्यासोबत फक्त सलमान खान उभा होता. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने खुलासा केला की, 1997 च्या सुपरहिट चित्रपट ‘जुडवा’साठी सलमान खान हा निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता. त्याच्याआधी हा चित्रपट गोविंदाला ऑफर झाला होता. मी तेव्हा माझ्या करिअरच्या टॉपवर होतो.
तेव्हा बनारसी बाबू चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. मी तेव्हा जुडवा चित्रपटासाठी पण काम करत होतो. त्याच दरम्यान एकदा मध्यरात्री २-३ च्या सुमारास मला सलमानचा फोन आला. चीची भैया, तू किती हिट चित्रपट देणार आहेस ? असं त्याने मला विचारलं. त्यावर मी त्याला विचारलं, का रे , काय झालं ?
तेव्हा सलमान म्हणाला की तुम्ही ‘जुड़वा’ चित्रपटाचे शूटिंग करत आहात ना. प्लीज तो प्रोजेक्ट सोडा आणि मला द्या. त्या चित्रपटाचा दिग्दर्शकही मला द्या, असं तो म्हणाला. त्यामुळे आधीच सुरू झालेला चित्रपट थांबवण्यात आला आणि सलमानने तो प्रोजेक्ट त्याच्या हाती घेतला.
1997 मध्ये डेव्हिड धवनने ‘जुडवा’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे बजेट 6.25 कोटी रुपये होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर 24.28 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात दोन जुळ्या भावांची कथा दाखवण्यात आली, ते दोन्ही रोल सलमानने केले. तो चित्रपट खूप हिट ठरला आणि सलमानला यश मिळालं. सलमान हा माझ्यासाठी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे असल्याचेही गोविंदाने नमूद केलं होतं.