भारतावर बॉम्बहल्ले करणाऱ्यांच्या मुलासोबत सरसंघचालकांचा नाश्ता; कोण होते अदनान सामीचे वडील? ज्यावरून राऊतांनी संघावर केला हल्लाबोल

प्रसिद्ध गायक अदनान सामीने सोशल मीडियावर मोहन भागवत यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोवरून संजय राऊतांनी संघावर हल्लाबोल केला होता. भारतावर बॉम्बहल्ले करणाऱ्याच्या मुलासोबत संघाच्या प्रमुखांनी नाश्ता केला, असं ते म्हणाले.

भारतावर बॉम्बहल्ले करणाऱ्यांच्या मुलासोबत सरसंघचालकांचा नाश्ता; कोण होते अदनान सामीचे वडील? ज्यावरून राऊतांनी संघावर केला हल्लाबोल
Mohan Bhagwat and Adnan Sami
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2026 | 10:20 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी समारोहात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामीने सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आणि त्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर निशाणा साधला. अदनान सामीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांना संघाला धारेवर धरलं होतं. ज्या व्यक्तीच्या वडिलांनी भारतावर बॉम्ब फेकले, त्यांच्या मुलासोबत संघ प्रमुख नाश्ता करत आहेत, असं राऊत म्हणाले होते. त्यांनी सरसंघचालकांच्या देशभक्तीवरच प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर अदनान सामीच्या वडिलांबद्दल सोशल मीडियावर विविध प्रश्न विचारले जाऊ लागले. अदनानचे वडील अरशद सामी खान कोण होते, त्यांनी भारताविरुद्धच्या युद्धात मोठी भूमिका बजावली होती का, याबद्दल जाणून घेऊयात..

अदनान सामी भारतीय नाही. त्याचा जन्म लंडनमध्ये झाला होता आणि आधी तो पाकिस्तानी नागरिक होता. 2016 मध्ये त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं होतं. अदनान सामीचे वडील अरशद सामी खान यांचं नाव पाकिस्तानच्या सैन्य इतिहासात अत्यंत गर्वाने घेतलं जातं. परंतु भारताच्या दृष्टीकोनातून ते घातक शत्रू होते. अरशद सामी खान हे पाकिस्तानी एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च लष्करी सन्मान ‘सितारा-ए-जुरत’ देण्यात आला होता.

1965 आणि 1971 ची युद्धे

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात अरशद सामी खान यांनी भारतीय हद्दीत प्रवेश करत बॉम्बहल्ला केला होता. पठाणकोट हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात त्यांनी भूमिका बजावली होती. अरशद सामी खान त्या F-86 सेबर जेट फॉर्मेशनचा भाग होते, ज्याने भारतीय विमानांना जमिनीवरच उद्ध्वस्त करायचं मिशन हाती घेतलं होतं. साइटेशननुसार, अरशद सामी यांनी 1965 च्या युद्धात संपूर्ण पाकिस्तान एअरफोर्समध्ये सर्वाधिक 61 तास 15 मिनिट कॉम्बॅट मिशन पूर्ण केलं होतं.

1971 च्या युद्धादरम्यान ते थेट सहभागी झाले नव्हते, परंतु त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष याह्या खान यांचे एडीसी म्हणून काम केलं होतं. अदनानचे वडील केवळ फायटर पायलट नव्हते तर ते निवृत्तीनंतर मोठे डिप्लोमॅटसुद्धा बनले. त्यांनी पाकिस्तानच्या तीन राष्ट्राध्यक्षांसोबत ‘एअर-डी-कँप’ (एडीसी) म्हणून काम केलं आणि नंतर अनेक देशांमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही ते होते. त्यांनी ‘Asalmi’s Memoirs’ या नावाने एक पुस्तक लिहिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी त्यांचे त्यांच्या युद्धातील अनुभवांचा उल्लेख केला आहे.