
Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. धर्मेंद्र यांचे कुटुंबीयदेखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. त्यांचे हे काम लक्षात घेता त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. परंतु तरीदेखील त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. असा निर्णय नेमका का घेण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यामागचे कारणही आता समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्या निधनाबाबतची माहिती प्रशासनाला उशिराने देण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून अगोदर तसा प्रस्तावर सरकारला पाठवावा लागतो. त्यानंतर सरकार या प्रस्तावाला मंजुरी देते. या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी स्वारस्य दाखवले नाही. धर्मेंद्र यांच्या निधानाची माहिती माध्यमांनादेखील उशिराने देण्यात आली. धर्मेंद्र यांच्यावर लवकर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.
माध्यमे तसेच बॉलिवूड जगतालाही धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती उशिराने समजली. धर्मेंद्र यांचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जात असताना त्यांचे निधन झाल्याचे सर्वांना समजले. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यादेखील थेट स्मशानभूमीतच दाखल झाल्या. अमिताभ बच्चन, आमीर खान यासारखे दिग्गज कलाकारही थेट स्मशानभूमीत पोहोचले. शाहरुख खान तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोहोचला.
दरम्यान, धर्मेंद्र यांचे सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना 1997 साली फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2012 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी शासकीय प्रक्रिया पार न पाडल्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमानात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.